लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम सुरु केली आहे . त्यात दैनिंदिन साफसफाईसह स्टीकर्स काढणे, प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई, शौचालय स्वच्छ करणे, पुतळे धुणे, तुटलेली झाकणे दुरुस्ती करणे, शहरातील रस्त्यांची व दुभाजकांची तसेच बस स्टॉपची स्वच्छता आदी कामे ह्या मोहिमेत केली जात आहेत.
सखोल स्वच्छता अभियान भाग - ३ अंतर्गत महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी मान्सूनपूर्व शहर स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे . त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सदर मोहीम सुरु करण्यात अली आहे .
मीरारोड व काशीमीरा परिसरातील प्रभाग समिती ६ च्य्या हद्दीत मान्सूनपूर्व शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष साफसफाई, स्टीकर्स काढणे, प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई, शौचालय स्वच्छ करणे, पुतळे धुणे, तुटलेली झाकणे दुरुस्ती करणे, शहरातील रस्त्यांची, दुभाजकांची, बस स्टॉपची स्वच्छता अशी अनेक कामे केली .
रस्त्यावरील धूळ स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेत अग्निशमन दलातील वाहनाच्या जेट स्प्रे व पाण्याच्या फवाराच्या सहाय्याने रस्ता सफाई मोहीम राबवली. तसेच परिसरात भेट देऊन अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले. या मोहीमेत शहरातील जबाबदार नागरिकांनी सहभाग नोंदवून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर मोहिमेमध्ये ९ किलोमीटर मुख्य व अंतर्गत रस्ते यांची साफसफाई करण्यात आली. सुमारे ५०० किलो धूळ स्वच्छ केली गेली. तर सुमारे २ हजार किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी करून १ हजार किलो हिरवा कचरा गोळा करण्यात आला.
ह्या मोहिमे दरम्यान थुंकून घाण केलेल्या सार्वजनिक १५ जागा साफ करण्यात आल्या. सुमारे १०० जागी चिटकवण्यात आलेले स्टिकर्स काढले गेले . ५ अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले . रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकल वापराच्या प्रतिबंधित प्लास्टिक वापणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अन्य प्रभाग समिती मध्ये देखील मोहीम राबवली जात आहे अशी माहिती पालिकेच्या वतीने दिली आहे .