ठाण्यातील जलतरण तलावांच्या नियमावलीत पालिका करणार बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:20 AM2020-11-20T01:20:14+5:302020-11-20T01:20:17+5:30
प्रस्ताव महासभेच्या पटलावर, शुल्क थेट पालिकेकडे भरावे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून खाजगी संस्थांना तरणतलाव चालविण्यासाठी दिले जात आहेत. मात्र, या संस्था शिकाऊ सभासदांकडून जादा फी वसूल करून महापालिकेची फसवणूक करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने तरणतलावांच्या नियमावलीत अंशत: बदल करण्याबरोबरच संस्थांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्काची रक्कम थेट महापालिकेकडे भरावी लागणार असल्याने त्याचा फायदा येथे सरावासाठी येणाऱ्या शिकाऊ सभासदांना होणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून गडकरी रंगायतन परिसरात कै. मारोतराव शिंदे आणि कळवा परिसरात कै. यशवंत रामा साळवी तरणतलाव चालविले जात आहेत. या दोन्ही तलावांचे परिचालन महापालिकेमार्फतच करण्यात येते. हे तरणतलाव जलतरण संस्थांना विशेष बॅचकरिता सवलतीच्या दरात भाड्याने देण्यात येतात. त्यासाठी एका जलतरणपटूमागे दरताशी ३० रुपये दर आकारला जातो. परंतु, या संस्थांना नवशिकाऊ सभासदांना फ्लोटद्वारे प्रशिक्षण देण्यास बंदी आहे. असे असतानाही या संस्था सवलतीच्या दरात तरणतलाव भाड्याने घेऊन नवीन सभासदांना फ्लोटद्वारे प्रशिक्षण देत असून सभासदांकडून जास्तीची रक्कम फीच्या स्वरूपात वसूल करीत होते. तक्रारी आल्यानंतर महापालिकेने अशा संस्थांना तरणतलावात प्रशिक्षण देण्यास प्रतिबंध केला होता.
अशी आहे नवी नियमावली...
nनव्या नियमावलीनुसार फ्लोटचा वापर करून सराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये ५० जलतरणपटूंना सराव करता येणार आहे, तसेच संस्थेला स्वत:च्या जबाबदारीवर सराव करावा लागणार आहे. अपघात झाल्यास त्यास पालिका जबाबदार असणार नाही.
nविशेष बॅचसाठी भाड्याने घेणाऱ्या संस्थांना आता प्रत्येक जलतरणपटूचे जिल्हास्तरीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. नव्या सभासदांना दरमहिन्याला एक हजार रुपये आकारून महिन्याचा पास दिला जाणार आहे.