महापालिका म्हणते, ठाण्यात केवळ २२६ खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:33 AM2019-09-17T00:33:21+5:302019-09-17T00:33:31+5:30

संततधार पावसाने ठाण्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

The municipality says, only 4 pits in Thane | महापालिका म्हणते, ठाण्यात केवळ २२६ खड्डे

महापालिका म्हणते, ठाण्यात केवळ २२६ खड्डे

googlenewsNext

ठाणे : संततधार पावसाने ठाण्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ज्या रस्त्यांवर यापूर्वी खड्डे पडत नव्हते, त्या रस्त्यांवरही ते पडले आहेत. ते बुजविण्यासाठी महापालिका नाना तºहेचे प्रयत्न करीत आहे. शहरातील रस्त्यांना हजारो खड्डे असल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला असून रस्त्यावरून प्रवास सुरू आहे की बोटीतून, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. मात्र, महापालिकेच्या दप्तरी शहरात केवळ २२६ खड्डेच भरणे शिल्लक असल्याची अजब माहिती समोर आली आहे. यामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्वच रस्ते चकाचक करण्यात आले होते. सेवारस्तेही वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदा खड्डेमुक्त प्रवासाची हमी पालिका प्रशासनाने दिली होती. मात्र, नेमेची येतो पावसाळा, तसे नेहमीच पडतात खड्डे, अशी म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे. सप्टेंबर महिना अर्धा झाला तरीही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे शहरातील सेवारस्ते, मुख्य रस्ते, अंतर्गत आदींसह इतर रस्त्यांचीही चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
येथे आहेत खड्डेच खड्डे
महापालिकेने नव्याने सुरूकेलेल्या कॅसल मिल येथील उड्डाणपुलावरही खड्डेचखड्डे दिसत आहेत. मल्हार सिनेमा, तीनहातनाका, नितीन कंपनी उड्डाणपूल, कॅडबरी उड्डाणपूल, तीनहातनाका उड्डाणपूल आदींसह शहरातील कळवा, घोडबंदर, कासारवडवली, पातलीपाडा उड्डाणपूल, डोंगरीपाडा उड्डाणपूल, डी मार्ट, आनंदनगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, साठेनगर, उथळसर, माजिवडा, कापूरबावडी, कोलशेत, बाळकुम, ढोकाळी, शीळफाटा, मुंब्रा बायपास आदींसह शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी ते बुजविण्याचे प्रयत्न झाले असले तरी पावसाने त्यातील वाळू पुन्हा इतरत्र पसरली असून अनेक ठिकाणी तिचे ढीग जमा झाले आहेत.
दरवर्षी कोट्यवधींचा खर्च महापालिका खड्डे बुजविण्यासाठी करते. इतर प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डेही पालिका बुजवत आहे. मात्र, आता इतर प्राधिकरणाचे खड्डे आम्ही बुजवत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. कारण, यासाठीचा खर्चही पालिकेला मिळत नाही. त्यामुळे खर्चाचा हा एक वेगळाच मुद्दा आहे. काही ठिकाणी तर पालिकेने दुसऱ्या प्राधिकरणाचे दोन ते तीन कोटींचे रस्ते नव्याने केले आहेत. मात्र, त्यांची बिले अद्यापही पालिकेला वसूल करता आलेली नाहीत. केवळ काही राजकीय ठेकेदारांसाठीच ही पैशांची उधळपट्टी मागील कित्येक वर्षे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
>२९११ खड्डे
भरल्याचा दावा
दुसरीकडे शहराच्या बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असताना शहरात केवळ २२६ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचा अजब दावा पालिकेने केला आहे. पालिकेने प्रभाग समितीनिहाय केलेल्या सर्व्हेत शहरात ५६३६ चौरस मीटर क्षेत्रफळावर ३१३७ खड्डे होते.
त्यातील ५५७५ चौ.मी. क्षेत्रफळावरील २९११ खड्डे भरले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, शहरात केवळ ३६१ चौ.मी. क्षेत्रफळावरील २२६ खड्डे भरणे शिल्लक असल्याची माहिती दिली आहे.
असे जर पालिकेचे म्हणणे असेल तर मग शहरातील वाहतुकीचा वेग का मंदावला, हा सवाल उपस्थित होत आहे. खड्ड्यांमुळे शहरात विद्यापीठपासून ते तीनहातनाक्यापर्यंत वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावल्याचे सध्याचे चित्र आहे.
>उपअभियंत्यांकडे
अतिरिक्त पदभार
महापालिकेत नऊ उपअभियंते आहे. त्यांच्याकडे कार्यकारी अभियंत्यांचा अतिरिक्त पदभार आहे. डोंबिवलीतील अभियंते सुभाष पाटील हे त्यांच्यावर हल्ला झाल्याने पावसाळ्यापूर्वी उपचारासाठी बराच काळ रजेवर होते.
कल्याण पूर्व, पश्चिमेसह टिटवाळ्यापर्यंतचा कार्यभार रघुवीर शेळके यांच्याकडे आहे. स्थायी समितीच्या सभेत त्यांनी तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यांवरील खड्डे महापालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांपेक्षा जास्त खोल असल्याचा दावा करून अकलेचे तारे तोडले होते.
अतिरिक्त पदभार असलेल्या अभियंत्यांकडूनही खड्डे बुजवण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्डे पडले आहेत. खड्डे व वाहतूककोंडी हे मुद्दे विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या कळीचा मुद्दा बनू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: The municipality says, only 4 pits in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे