भिवंडी - तीन तलाकचा विषय देशात गाजत असताना शहरातील गुलजारनगर येथे पत्नीला स्टॅम्प पेपरवर तीन तलाक देऊन घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीसह पाच जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विठ्ठलनगर येथील शबनमचा गुलजारनगर येथील सरदार इसरार अहमद मन्सुरी याच्याशी मे 2016 मध्ये निकाह झाला होता. मे ते नोव्हेंबर 2016 दरम्यान पतीच्या कुटुंबियांनी वारंवार भांडण केले. शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच दुचाकी अथवा 50 हजार वडिलांकडून घेऊन दे, अशी मागणी करत वारंवार तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला. तसंच पतीच्या कुटुंबियांनी स्त्रीधन स्वत:कडे ठेवत घरातून हाकलून दिले. त्यामुळे पीडित शबनम ही आपल्या माहेरी पाहत होती असे तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
तिच्या पतीने 100 रुपयांच्या स्टॅम्पवर 'तीन तलाक' देत तो स्टॅम्प पेपर पोस्टाने माहेरी पाठवला. याविरोधात पीडित महिलेने 26 जानेवारीला सरदार इसरार अहमद मन्सुरी, जुलेखा अहमद मन्सुरी, रेहान इसरार अहमद मन्सुरी, आफरीन रेहान मन्सुरी या पाच जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांचा तपास सुरु असला, तरी त्यांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.