उल्हासनगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमे अंतर्गत पहिल्या फेरीत ४ लाख ५८ हजार नागरिकांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:22 PM2020-10-14T17:22:20+5:302020-10-14T17:22:32+5:30
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना व उपक्रम राबवित आहे.
उल्हासनगर : महापालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत पहिल्या आरोग्य तपासणी फेरीत ४ लाख ५८ हजारा पेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती महापालिका जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. दुसरी फेरी १४ ते २३ आॅक्टोबर दरम्यान सुरु राहणार आहे.
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना व उपक्रम राबवित आहे. मुख्यमंत्री यांनी घोषीत केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमअंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण व आरोग्य शिक्षण देण्यासाठी एकूण १८८ आरोग्य पथकाची स्थापना केली. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर व १४ ते २३ आॅक्टोबर अश्या दोन टप्प्यात महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले. पहिल्या सर्वेक्षण फेरीत आरोग्य पथकाने १ लाख २१ हजार ८३१ घरातील ४ लाख ५८ हजार २४४ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्यापैकी ८ हजार ३०६ नागरिकांना मधुमेह, हृदयविकार,यकृत व किडनी विकारा सह इतर रोगाचे रुग्ण मिळाले. तर ताप, खोकला लक्षणे असलेले ९६२ रुग्ण मिळाले.
महापालिका आरोग्य पथकाने ९९७ नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, ७० रुग्णाची कोरोना चाचणी पोझीटीव्ह आली. त्यांच्यावर कोविड रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्यातील सर्वेक्षण १४ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सुरू होणार असल्याची माहिती महापालिका जनसंपर्क कार्यालयाने काढलेल्या पत्रकाद्वारे प्रसिध्द केले. घरोघरी सर्वेक्षण साठी जाणाऱ्या आरोग्य पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया आरोग्य कर्मचारी देत आहेत. तर काही नागरिक स्वतःहुन संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घेत आहेत.