भाजपामधील शुक्राचार्यांनी रोखली नाईक- नड्डा भेट; निष्ठावतांची एकजूट!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 07:44 PM2019-09-16T19:44:08+5:302019-09-16T19:48:05+5:30
भाजपामधील जुनी मंडळी आणि २०१४ पूर्वी किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेली मंडळी एकत्र आली आहेत.
- अजित मांडके
ठाणे : माजी मंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात भाजपचे ठाणे जिल्ह्यातील नेते आणि यापूर्वी नाईक यांच्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले नेते एकवटले आहेत. नाईक यांना व्यासपीठावर खुर्ची न देण्याची घटना घडण्यापूर्वी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नाईक यांच्याशी होणारी भेट याच कंपूने टाळली गेली तर गडकरी रंगायतनच्या व्हीआयपी रुममध्येही ही भेट होणार नाही, याचा चोख बंदोबस्त केला गेला, अशी माहिती आता उजेडात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात भाजपाकडे एकच सक्षम नेता नसल्याने भविष्यात कदाचित नाईक यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व दिले गेले तर आपली पंचाईत होईल या कल्पनेनी भाजपामधील जुनी मंडळी आणि २०१४ पूर्वी किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेली मंडळी एकत्र आली आहेत. वस्तुत: आतापर्यंत संघ परिवाराच्या मुशीत वाढलेली जुनी भाजपाची मंडळी आणि राष्ट्रवादीतून आलेल्यांमधून विस्तव जात नव्हता. मात्र नाईक यांचा साऱ्यांनीच धसका घेतला आहे.
नाईक आणि कार्याध्यक्ष नड्डा यांची ठाण्यातील एका हॉटेलमध्ये सुनियोजित भेट ठरली होती. त्यासाठी येथील एक स्युट बुक केला होता. मात्र, भाजपामधील स्थानिक मंडळींनी ही भेट होऊ नये यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. यापूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्या पण वेगळी चुल मांडणा-या मंडळींनी एकत्र येऊन हे कारस्थान घडवल्याचे सुत्रांनी सांगितले.
नाईक आणि नड्डा यांची कार्यक्रमापूर्वी ठाण्यातील ज्या हॉटेलमध्ये भेट होणार होती तिच्याबाहेर पोलीस बंदोबस्त लावला होता. मात्र, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सभेची वेळ होईपर्यंत नड्डा यांना ठाण्यातील भेटीगाठींमध्ये व्यस्त ठेवले. परिणामी नाईकांना नड्डा यांना भेटता आले नाही. आता उशिर झाल्याने गडकरी रंगायतनच्या व्हीआयपी रुममध्ये ही भेट होईल, असे सांगितले गेले. मात्र, ज्या व्हीआयपी रुममध्ये ही भेट होणार होती. त्याठिकाणी आधीच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे तेथेही भेट होऊ शकली नाही. व्यासपीठावर आपल्याकरिता बसायला खुर्ची नसल्याचे लक्षात आल्यावर हेतूत: हे घडवण्यात आल्याचे नाईक यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
जिल्हा नेतृत्वासाठी निष्ठावतांची एकजूट
नाईक भाजपामध्ये डेरेदाखल झाल्याचा धसका भाजपमधील मूळ नेते आणि काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून पक्षात दाखल झालेल्या मंडळींनी घेतला आहे. नाईक यांना जिल्हा नेतृत्वाचा अनुभव असून त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत आहे. शिवाय नाईक हे आर्थिकदृष्ट्या तगडे नेते आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे दिली तर आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती या मंडळींना वाटत आहे. यामुळे जिल्हा नेतृत्व हे आपल्यापैकीच कोणाला तरी मिळावे पण ते नाईक यांच्याकडे जाऊ नये यासाठी आपापसातील मतभेद विसरून सारेच एकत्र आले आहेत. यापूर्वी भाजपमधील ज्या मंडळींचे एकमेकांशी पटत नव्हते. ज्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही, असे सर्वजण नाईकांना रोखण्यासाठी एकत्र आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नाईकांच्या भाजप प्रवेशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांजवळ एका मोठ्या उद्योगपतींने प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नाईकांचा प्रवेश भाजपला ठाणे जिल्ह्यात कशी संजीवनी देऊ शकेल, हे पटल्याने त्यांचा प्रवेश झाला आहे. मात्र नाईक यांना भाजपमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचाही नाईक यांना विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रवेशाच्यावेळी त्यांच्यावर स्तुतीसूमने उधळलेली असतानाही नाईकांच्या विरोधात केलेल्या या कारस्थानाची आता पक्ष कशी दखल घेतो, याकडे लक्ष लागले आहे.