मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका
By अजित मांडके | Published: June 29, 2023 03:21 PM2023-06-29T15:21:13+5:302023-06-29T15:22:42+5:30
शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने ठाणे महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. शहरातील ३८ हून अधिक भागात पाणी साचल्याने ठाणेकरांचा चांगलेच हाल झाले. त्यामुळे नालेसफाईची कामे किती चांगली झाली होती, हे देखील समोर आली आहे. याच मुद्यावरुन राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीव्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.
ठाण्यात बुधवारी तब्बल १४८.५७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही शहरातील ३८ हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. वृदांवन सोसायटीमधील तब्बल १५० इमारती पाण्याखाली आल्या होत्या. नाल्यातील आणि गटारातील पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी अशीच काहीशी परिस्थिती होती. तिकडे दिव्यातही अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. त्यातही पावसाळा सुरु झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांची कामे देखील अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान शहरातील नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर, दिवा आदी भागात पाणी साचले होते. या भागांमध्ये तुंबलेल्या पाण्याची चित्रफित समाजमाध्यामांवर प्रसारित करत राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांवर टिका केली आहे. पहिल्या दोन दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे. असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता. विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतरही ठाण्यात पाणी तुंबणार, त्याकडे लक्ष द्या,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या विशेष सेवेत दंग असणाºया आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..! अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देतील अशी मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी.. घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..! अशी टिकाही त्यांनी केली आहे. तर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यातील विदारक चित्रच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्या 2 दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे.असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता.विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 28, 2023
"ठाण्यात पाणी तुंबनार,त्याकडे लक्ष द्या",अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे आयुक्त यांच्याकडे केली होती.परंतु मुख्यमंत्र्यांच्या… pic.twitter.com/EUHIwotgyb