राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे अनंतात विलीन: मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:05 PM2018-01-05T23:05:53+5:302018-01-05T23:32:28+5:30
आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत राज्यभरातील अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी वसंत डावखरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र प्रबोध यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून डावखरे मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. नोव्हेंबरमध्येही त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी गेली दोन महिने मृत्यूशी झुंज दिली. अखेर गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी डावखरे यांचे पार्थिव मुंबईहून ठाण्याच्या हरीनिवास चौक परिसरातील गिरीराज हाईट्स येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार दिपक पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार नितिन सरदेसाई, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार शिवसेना उपनेते अनंत तरे, दशरथ पाटील , खासदार राजन विचारे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, ठाण्याचे आमदार संजय केळकर,भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाण्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पुणे जिल्ह्यातील वसंतरावांचे मूळ गाव हिवरे येथील ग्रामस्थांसह असंख्य चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रातील हितचिंतक आणि मित्रपरिवाराने अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारी ३ वाजल्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी तीन हात नाका परिसराकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने तुडूंब भरले होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरीजा हाईटस ते जवाहर बाग स्मशानभूमी, मासुंदा तलाव मार्गावर ठाणेकर जमा झाले होते.
अंत्ययात्रा स्शानभूमीत आल्यानंतर मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ५ वाजण्याच्या सुमारास पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन यांनी मंत्रोच्चारात त्यांना अग्निडाग दिला. तत्पूर्वी, राज्य शासनाच्या वतीने ठाणे शहर मुख्यालयाच्या दहा जवानांनी हवेत प्रत्येकी तीन फैरी झाडून डावखरे यांना मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी राज्य शासनाच्या वतीने पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
वैकुंठरथामध्ये नातेवाईकांसह पालकमंत्रीही सहभागी...
डावखरे यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वैकुंठ रथामधून नेण्यात आले. त्यावेळी पुत्र निरंजन, प्रबोध, स्रुषा निलीमा आणि सोनिया, नातवंडे मधूर, विहान, देवराज आणि सिया तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते त्यांच्या पार्थिवासमवेत होते.
जगनमित्र हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वसंतराव डावखरे हे ख-या अर्थाने जगनमित्र होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्री केली. सभागृहात एखाद्या विषयावरुन वातावरण तापलेले असताना ते शांत करायचे. एका वेगळया राजकीय संस्कृतीत जगणारा आणि स्वत:च्या चेह-यावर गांर्भीय ठेवून सर्वांशी हसून-खेळून राहणारे ते एक जॉली व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.