राष्ट्रवादीचे नेते वसंतराव डावखरे यांची प्रकृती गंभीर, नेत्यांची रीघ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 07:10 PM2017-11-23T19:10:10+5:302017-11-23T20:22:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले आहे.
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही गुरुवारी त्यांची भेट घेतली. प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुत्रपिंडाच्या विकाराने ते ग्रस्त असून त्यांच्यावर अलिकडेच ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्गाचा त्रास झाल्यामुळे गेली अनेक दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. घरीही त्यांच्यावर उपचार सुरुच होते. बुधवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. गुरुवारी श्वसनाचाही त्रास झाल्याने त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
नेत्यांची रीघ
डावखरे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ठाणे, मुंबई आणि पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांनी गुरुवारी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विधानसभा निवडणूकीत त्यांचे पुत्र आमदार निरंजन यांचा ठाणे शहर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली होती. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे तसेच त्यांच्या भेटीसाठी येणाºयांवर काहीशी मर्यादा ठेवली होती. अगदी अलिकडेच ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळीही त्यांची प्रकृती फारशी व्यवस्थित नव्हती, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.