ठाणे-
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
"पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही कलम ३५४, मी या पोलीसी अत्याचाराविरुद्ध लढणार...मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या...उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एका गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेनं आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेरून 'लोकमत' लाइव्ह...
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमकदरम्यान, आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गु्न्हा दाखल होताच आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर निदर्शनाला सुरुवात केली आहे. आव्हाड समर्थकांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. तसंच पोलीस ठाण्याचं प्रवेशद्वार देखील कार्यकर्त्यांनी बंद केलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"