अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल सध्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या उड्डाणपुलावर पाणी साचू नये यासाठी नगरपालिकेने हुतात्मा चौकाचे काँक्रीटीकरण करत असताना उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर नाला बनविला आहे. रस्त्याच्या मधून हा नाला जात असल्याने त्या नाल्यावर लोखंडी जाळी टाकण्यात आली आहे. या नाल्यावरील अनेक लोखंडाच्या पट्ट्या निघाल्याने ही जाळी धोकादायक अवस्थेत आहे. ही जाळी ज्या कॉंक्रीटीकरणावर घट्ट बसविण्यात आली होती, ते कॉंक्रीटीकरणदेखील तुटल्याने त्यावर वाहने आदळत आहेत. ज्या ठिकाणी हा नाला बनविण्यात आला आहे तो भाग आणि उड्डाणपुलाचा भाग यामध्ये चढउतार झाल्याने त्या ठिकाणी वाहनचालकांना उतरणीचा अंदाज येत नाही. त्यातच या उतरणीवर गेल्यावर वाहन जाळीवर जोरदार आदळले जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आलेल्या या नाल्यावर नव्याने जाळी बसविण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.
दुसरीकडे ज्या ठिकाणी हा नाला बनविण्यात आले आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात उतार निर्माण झाल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. हा उतार कमी करण्यासाठी उड्डाणपुलाला जोडणाऱ्या कॉंक्रीटीकरणाची पुनर्बांधणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या रस्त्यावरील समस्या कायमस्वरूपी सोडवणे ही काळाची गरज ठरत आहे.
...............
उड्डाणपुलाच्या या समस्येबाबत अधिकाऱ्यांना त्याठिकाणी जाळीची तत्काळ दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जाळीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येणार असून, भविष्यात या ठिकाणचा धोकादायक उतार कमी करण्यासाठी पालिका नियोजन करीत आहे.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी
---------------