ठाणे : जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) या तिघांना गुरुवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांना ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील मुख्य सूत्रधार निलेश तोंडलेकर याचा मात्र शोध सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.जुनी वाहने विकत घेऊन त्या बदल्यात ग्राहकांना नवीन वाहने देण्याचा निलेशचा व्यवसाय आहे. त्याने कर्जत येथे ‘ओमसाई मोटर्स’ या नावाने दुकानही थाटले आहे. जुने वाहन विकणाºयांना नवीन वाहन त्याच्याकडून खरेदी करताना तो त्यासाठी चांगली सूट देत होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडून जुन्याच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करत होते. दरम्यान, ठाण्यातील पाचपाखाडी येथील ‘विद्या मोटर्स’ चे चालक विनीत थोरवे यांचाही जुनी वाहने खरेदीविक्रीचा व्यवसाय आहे. तेही निलेशकडून नवीन वाहने घ्यायचे आणि ग्राहकांना विक्री करायचे. काही दिवसांपूर्वी निलेशने वेगवेगळ्या ग्राहकांकडून आठ वाहनांची खरेदी केली. ही ५४ लाखांची आठ वाहने त्याने थोरवे यांना दिली. त्यांच्याकडून त्याने ५४ लाख रुपयेदेखील घेतले. मात्र, निलेशने ज्यांच्याकडून ही वाहने खरेदी केली, त्यांना त्याने पैसेच दिले नाही. काही जणांकडून त्याने पैसे घेतले, पण वाहनाचा ताबा मात्र दिला नाही. अशी वेगवेगळ्या प्रकारे हेराफेरी करून थोरवे यांच्यासह त्याने अनेकांची फसवणूक केली. त्यानंतर तो पसार झाला. या फसवणुकीमुळे ग्राहकांनी तोंडलेकर यांच्या कुटुंबीयांकडे पैसे आणि गाड्यांसाठी तगादा लावला. तेव्हा, त्याचे वडील मुरलीधर तसेच प्रसाद आणि नंदकुमार या भावांनी आपली नेरळ, कर्जत येथे २१ गुंठे जमीन आहे, ती नावावर करण्याचे आश्वासन थोरवे याला दिले. त्याबदल्यात त्याने या ग्राहकांची वाहने त्यांना परत करावी, असा आग्रह मुरलीधर तोंडलेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धरला. त्यावर विश्वास ठेवून थोरवे यांनी संबंधित ग्राहकांना त्यांची आठही वाहने परत केली. प्रत्यक्षात तोंडलेकर कुटुंबाने त्यांच्या नावावर जमीन केली नाही आणि ५४ लाख रुपयेदेखील दिले नाही. अखेर, थोरवे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०१७ रोजी ५४ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशीनंतर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, उपनिरीक्षक किरण बघदाने यांच्या पथकाने मुरलीधर तोंंडलेकर यांच्यासह तिघांना अटक केली. यातील मुख्य सूत्रधार निलेशचा मात्र शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.