नव्या वर्षात दिवावासियांची होणार डंपिंगमधून सुटका! भंडार्लीची जागा ठाणे पालिकेच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:19 PM2021-12-02T19:19:17+5:302021-12-02T19:19:37+5:30
diva dumping ground : कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. आज जागाताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केली.
ठाणे : गेली अनेक वर्षे दिवावासीयांना भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या डम्पिंगचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यासाठी ठाणे महापलिकेला यश आले आहे. मागील निवडणुकीत दिवेकरांना दिलेला शब्द शिवसेनेने पाळला असून नव्या वर्षात दिवावासीयांची डम्पिंग मधून सुटका होणार आहे. कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. आज जागाताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केली. त्यामुळे आता दिवावासियांची डंपिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. राज्याचे नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने ताब्यात आलेल्या भंडार्ली येथील जागेवर लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विघटन प्रकल्प सुरू होणार असल्याचे महापौर व आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाणे शहरातील दैनंदिन बहुतांश कचरा हा दिवा येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत होती. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेला स्वत:ची जागा असावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागेची पाहणी करण्याचे काम सुरू होते. अखेर मौजे भंडार्ली येथील अंदाजे 10 एकर जागा इतकी खाजगी जागा भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली, या जागाताबा करारनाम्यावर आज महापौर नरेश म्हस्के व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षरी केली.
यावेळी दिवावासियांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहराचा कचरा दिवा येथील डंपिंगग्राऊंडवर टाकण्याची परवानगी दिली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाढणारा कचऱ्यामुळे दिवावासियांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. मात्र भंडार्ली येथे जागा उपलब्ध झाल्यामुळे दिवावासियांची डंपिंग्र गाऊंड समस्येतून मुक्तता होणार असल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी दिव्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आभार व्यक्त केले. तर भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिका घेणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधाला विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
महापालिकेच्या या स्वत:च्या जागेवर लवकरच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतचे काम येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासनस्तरावरील सर्व परवानग्या मिळण्याकामी पूर्तता केली असून त्यास मंजूरी मिळेल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या जागेची लवकरच पाहणी करेल. नंतर जागेवरील मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील व लवकरच हा प्रकल्प सुरू होईल असा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान वागळे इस्टेट येथील सी.पी. तलाव जवळ असलेल्या कचरा विघटन केंद्र हे देखील भविष्यात बंद करण्याचा विचार असून भंडार्ली येथे प्रकल्प सुरू झाल्यास त्याच ठिकाणी विघटन प्रक्रिया सुरू करण्याचा विचार असल्याचे यावेळी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले आहे.