स्वच्छताच नाही, मग बिले का द्यायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:14 AM2019-08-02T01:14:11+5:302019-08-02T01:14:33+5:30
परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांचा सवाल : देयक ांच्या प्रस्तावांना दिली स्थगिती
कल्याण : केडीएमटी बसची स्वच्छताच होत नाही. मग, झाडू मारल्याच्या कामाची बिले का मंजूर करायची, असा सवाल भाजप सदस्य संजय मोरे आणि संजय राणे यांनी गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत केला. बसची स्वच्छता होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने झाडूकामासंदर्भातील आठ विषय तूर्तास स्थगित ठेवण्यात येत असल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी जाहीर केले.
केडीएमटीतील बसची स्वच्छता करण्यासाठी दैनंदिन झाडू मारण्याच्या कामाचे कंत्राट मे. आशा इंजिनीअरिंग वर्क्स यांना देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने केलेल्या कामांच्या बिलांचे प्रस्ताव गुरुवारी झाडलेल्या परिवहनच्या बैठकीत सादर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख कारागीर तथा प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक तृषांत मुळीक यांनी माहिती देताना सकाळ-सायंकाळ अशा दोन वेळेला झाडू मारला जात असल्याचे सांगितले. त्यावर मोरे यांनी हरकत घेतली. झाडू मारण्याचे काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या कामाचे कंत्राट दिले असताना त्यावर उपक्रमाने नियंत्रण ठेवणारा अधिकारी नेमला होता का, असा सवालही मोरे यांनी केला. त्यावर कारागीर सुभाष साळुंखे यांची नेमणूक सुपरवायझर म्हणून केली होती, असे मुळीक यांनी सांगितले.
परंतु, साळुंखे काम करतात का, असा सवाल राणे यांनी मुळीक यांना केला. साळुंखे यांच्याबाबतीत कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्टीकरण मुळीक यांनी देताच मोरे यांनी हरकत घेत साळुंखे यांना मग समज का देण्यात आली , असा सवाल केला. यावर समाधानकारक उत्तर मुळीक यांना देता आले नाही. अखेर, सर्वच सदस्यांनी केलेल्या मागणीवरून आठही प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.
बिले उशिरा का आली? : बसचे जुने टायर, कट रिपेअरिंग, रिमोल्डिंग, टायर चेंजर मशीनची दुरुस्ती, सुटे भाग बदलणे, हब किट, व्हील डिस्क, ब्रेक पॅड कीट दुरुस्ती आदी कामांची २०१७ ची बिलेही गुरुवारी मंजुरीसाठी दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी चार प्रस्ताव होते. चर्चेच्या वेळी मोरे यांनी बिले दोन वर्षांनंतर मंजुरीसाठी का आणली गेली, असा सवाल केला. यावर मुळीक यांनी संबंधित कंत्राटदारांकडून ती उशिराने आल्याचे सांगितले. ही बिले ६७ हजार ते साडेपाच लाखांपर्यंत असल्याने सध्या हे प्रस्ताव स्थगित ठेवून विशेष बैठक बोलवाली, अशी मागणी मोरे यांनी केली.