ठाणे : कळवा-पडघा केंद्रातून वीजपुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मुंबईसह ठाणे शहरातील अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती. दुपारनंतर काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाला, तर काही भागांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत विजेचा पत्ता नव्हता. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरून काम करणाºया कर्मचाऱ्यांना व ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवणाºया विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाºया टेमघर येथील व ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपिंग स्टेशन बंद झाल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता.
महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-१ ची देखभाल, दुरुस्ती करत असताना, त्याचा सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्येच अचानक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यातील अनेक भागांमध्ये सकाळी १० च्या सुमारास अचानक वीजपुरवठा बंद झाला. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने खासगी क्षेत्रातील अनेकजण आजही ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अचानक सकाळपासून बत्ती गुल झाल्याने घरून काम करणाºयांची चांगलीच पंचाईत झाली. घरातील नेट कनेक्शन बंद पडणे, लॅपटॉप चार्ज न केल्याने सुरू न होणे या प्रकारांनी अनेकांची डोकेदुखी वाढली. त्यातच लॉकडाऊनमुळे मेंटेनन्स न झाल्याने घरातील इन्व्हर्टरने दगा दिल्याने अनेकांवर घरात घाम पुसत महावितरणला शिव्याशाप देण्याची वेळ आली. आॅनलाइन शिक्षणाचे धडे गिरविणाºया विद्यार्थ्यांनादेखील या गोंधळाचा फटका बसला.
दरम्यान, ठाणे शहरातील घोडबंदर रोडचा काही भाग, वागळे इस्टेट, बाळकुम ढोकाळी आणि कोपरी, कळवा, मुंब्रा, दिवा यासह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. घोडबंदरमधील काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत होता. ठाणे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा दुपारी सुरळीत झाला.अत्यावश्यक सेवेतील रेल्वे प्रवाशांचे हालवीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाला होता. सध्या रेल्वेसेवा सर्वांकरिता उपलब्ध नसली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी उपनगरीय लोकलची वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे डब्यांत अडकले. डब्यांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने प्रवासी अक्षरश: हैराण झाले. अनेकांनी रेल्वेडब्यांतून रुळांवर उड्या ठोकून पायी चालत प्रवास सुरू केला.