खोटी माहिती देणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांना अखेर नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:32 AM2019-11-15T00:32:52+5:302019-11-15T00:32:55+5:30
आॅनलाइनद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.
ठाणे : आॅनलाइनद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यावेळी सोयीची शाळा प्राप्त करण्यासाठी बहुतांश शिक्षकांनी खोटी व चुकीची माहिती भरून जवळच्या शाळांमधील बदलीचा लाभ घेतला आहे. जिल्हाभरातील सुमारे ६८ शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे जिल्हा परिषदेने आता त्यांना कायदेशीर नोटीस देऊन पाच दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. यामुळे या शिक्षकांचे आता धाबे दणाणले आहे.
जवळच्या शाळांमध्ये बदली करून घेण्याच्या हेतूने या ६८ शिक्षकांनी चुकीची व खोटी माहिती आॅनलाइन दाखल केल्याचे निदर्शनात आले आहे. बदलीद्वारे जवळच्या शाळेचा लाभ घेतलेल्या या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन प्राथमिक शिक्षण विभागास चांगलेच धारेवर धरले आहे. या शिक्षकांचे निलंबन व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने त्यांनी कायदेशीर बाबींची चाचपणी सुरू केली आहे. तत्पूर्वी या ६८ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांना खोटी व चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याने खुलासा मागितला आहे.
।शिक्षकांची संख्या वाढून शिक्षण विभागाचे पितळ उघड
प्राथमिक शाळांमधील या बहुतांश शिक्षकांना ही नोटीस प्राप्त झाल्याचे आढळून आले आहे. खोटी माहिती देऊन अवघड क्षेत्रातील शाळेऐवजी शहराजवळील आणि सोयीस्कर, सोपी शाळा मिळवणाºया शिक्षकांप्रमाणेच बनावट वैद्यकीय दाखले, पतीपत्नी एकत्रीकरण, आईवडील आजारी अशीही खोटी माहिती आॅनलाइन भरून जवळच्या सोयीस्कर शाळा मिळवणाºया शिक्षकांवर हा कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामध्ये ६८ शिक्षकांची नोंद प्रशासनाने घेतली आहे. यापेक्षा अधिक शिक्षक या कारवाईस पात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खोटी माहिती देऊन त्यांच्यावर ही कारवाई होत नसलेल्या शिक्षकांची तक्रार कारवाईस पात्र ठरवलेल्या शिक्षकांकडून केली जाणार आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणाचे पितळ उघडे पडण्याची शक्यताही दिसून येत आहे.