हल्ली शहरातील आभाळच खिडकीएवढे झाले आहे; अशोक बागवे यांची खंत
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 5, 2024 04:38 PM2024-05-05T16:38:38+5:302024-05-05T16:43:15+5:30
गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कवींना कातरवेळी लिहायला आवडते. कातरवेळेला सूर्य मावळतो, आकाश उदास व्हायला लागते, तेव्हा शब्दांची निर्मिती जास्त होते. तिन्ही सांजा या शहरात दिसत नाही कारण आपले आभाळच खिडकी एवढे झाले आहे . गावाला गेल्यावर मात्र लांब क्षितीज दिसते. त्यातील तिव्ही सांजा त्यातील सूर्य मावळताना तुम्हाला टाटा करुन जातो आणि गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.
कवी उद्धव वाघमारे यांच्या 'सांजवेळ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते मंगला हायस्कूल येथे संपन्न झाले. यावेळी प्रा. बागवे म्हणाले की, कवितेतील भावना या गद्य लिखाणात सापडत नाही. अंतर्नाद हा कविलाच कळत असतो. माणूस गेला तरी त्याची अक्षरे राहतात. सांजवेळ ही कवीच्या सृजनशीलतेला आव्हान देणारी असते. त्यांच्या गावाकडच्या कवितांमधील निसर्गसौंदर्याचे विशेष त्यांनी अधोरेखित केले. कवितेत भावनांची पेरणी पाहिजे; वैचारिकता हा कवितेचा गुणधर्म नाही असेही ते म्हणाले. प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या अनुभवांचा प्रामाणिकपणा, कवितेमधली सरलता, सुगमता हा या संग्रहाचा विशेष आहे. सांजवेळेत होणारी जशी रंगांची विलोभनीय उधळण असते तसे भावनांचे रंग या कवितासंग्रहात आहेत.
कवी गीतेश शिंदे म्हणाले की, वाघमारे यांचा हा पहिलाच संग्रह असला तरी आयुष्यभर त्यांनी कवितेची केलेली साधना दिसते. वाघमारे यांनी आपल्या मनोगतात त्यांचा खडतर प्रवास मांडला. मी स्वतः रुढार्थाने कवी नाही, पण मला कविता लिहिणे आवडते. माझे अनुभव मी कवितेतून मांडत गेलो असेही ते म्हणाले. तपस्या नेवे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.