अरे बापरे! डोंबिवलीत बँक ग्राहकांचे पैसे कोणीतरी दिल्लीतून काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 04:08 PM2018-01-20T16:08:53+5:302018-01-20T16:41:47+5:30
बँकेत ठेवलेली कष्टाची पुंजी ही आता सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडलेल्या विचित्र प्रकारांमुळे समोर आली आहे.
डोंबिवली - बँकेत ठेवलेली कष्टाची पुंजी ही आता सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडलेल्या विचित्र प्रकारांमुळे समोर आली आहे. येथील ग्राहकांची विविध बँकांंमध्ये खाती असून त्यातील काही ग्राहकांच्या खात्यातील पैसे अचानकपणे विड्रॉ झाले असून दिल्लीमधून ते वळते झाले आहेत. येथील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅनरा बँकेमधील सुमारे ७ ग्राहकांना असा विचित्र अनुभव आला असून त्यांच्या खात्यातील सुमारे सव्वा दोन लाखांची कॅश ही दोन दिवसांपासून आपोआप वळती झाली आहे.
प्राथमिक माहितीनूसार ही घटना गुरुवार रात्रीपासून घडल्याचे बँक प्रशासनाच्या निदर्शनास आले असून ग्राहकांनी त्यासंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. कॅनरा बँक ही पूर्वेकडील पाटकर रोड नजीक असून तेथिल सात ग्राहकांना हा अनुभव आला असून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्या सात जणांमध्ये दोन महिला, तर अन्य पुरुष असल्याचेही सांगण्यात आले.
कोणाचे ६० हजार, १५हजार, तर कोणाचे ७० हजार २ हजार अशा विविध स्वरुपात रकमा खात्यातून आपोआप वटल्याची माहिती समोर आली आहे. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनीही ‘लोकमत’च्या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणाची माहिती या पोलिस ठाण्याचा गुन्हे विभाग पोलिस अधिकारी आणि अन्य कर्मचारी करीत असून सध्या ते बँकेत माहिती घेण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता ही घटना घडली असून त्यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून ग्राहकांनी तक्रारीही दिल्याचे सांगण्यात आले. नेमका हा प्रकार एटीएम तसेच अन्य कशामुळे घडला आहे का याचीही चाचपणी करण्यात येत आहे. तसेच नेटबँकींग मुळे ही घटना घडली असण्याचीही शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
परेश बोंडीवले हे रामनगरला रहात असून पूर्वेकडील पाटकर रोडच्या कॅनरा बँकेत त्यांचे खाते आहे. शुक्रवारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनात त्यांनी पेट्रोल भरले होते, पण मोबाईल अलर्ट मेसेज आला तेव्हा मध्ये चेक केले तेव्हा कळले की खात्यातून हजार बाराशे एवेजी तब्बल दहा हजार वळते झाले आहेत. त्यानूसार त्यांनी बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना बँकेने सांगितले की, अशा काही खातेदारांच्या घटना घडल्या असून त्यासंदर्भात पोलिस तक्रार द्यावी, त्यानूसार त्यांनी तातडीने शनिवारी सकाळी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून त्याची एक प्रत बँकेत जमा केल्याचेही बोंडीवाले यांनी ‘लोकमत’सांगितले.