एमआयडीसीत पुन्हा तेलमिश्रित पाऊस? आज प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 11:57 PM2019-09-08T23:57:31+5:302019-09-08T23:57:41+5:30
वाढते प्रदूषणच जबाबदार, रहिवाशांचा आरोप
डोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरात रविवारी तेलमिश्रित पाऊस पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रदूषणच याला कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली असून सोमवारी त्यांचे पथक तपासणीसाठी दाखल होणार आहे. दरम्यान, एमआयडीसी परिसरात २०१४ मध्ये हिरवा पाऊस पडल्याची घटना घडली होती.
गेल्या आठवड्यापासून डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी एमआयडीसी फेज नं. १ मधील काही कंपन्यांच्या परिसरात तेलमिश्रित पाऊस पडला. कंपन्यांच्या शेडवरून पाइपद्वारे जे पावसाचे पाणी येत होते, ते तेलमिश्रित असल्याचे आढळले. शेडवर पाहणी केली असता तेथेही तेलमिश्रित पाणी दिसले. कंपनीवाल्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी ही माहिती दक्ष नागरिक राजू नलावडे यांना दिली. त्यांनी तत्काळ कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला. मात्र, रविवारी कार्यालय बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आला असता सोमवारी पथकाद्वारे संबंधित परिसराची पाहणी केली जाईल, असे सांगितल्याची माहिती नलावडे यांनी दिली. कंपनीवाल्यांनी तेलमिश्रित पाण्याचे नमुने गोळा केले असून ते पथकाला दिले जाणार आहेत. प्रदूषणामुळेच ही घटना घडल्याची चर्चा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नलावडे यांनी केली आहे.
रासायनिक कंपन्यांचे प्रदूषण एमआयडीसीतील रहिवाशांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. या कंपन्यांमधून होत असलेल्या प्रदूषणामुळे येथील रहिवासी आधीच त्रस्त आहेत. यामुळे ते वारंवार आजारीही पडत आहेत. यासंदर्भात तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
पाच वर्षांपूर्वी चक्क हिरव्या रंगाचा पाऊसही पडला होता. तेव्हाही प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यानंतरही नाल्यांमधून तांबडे आणि पिवळे पाणी वाहत होते. गेल्यावर्षी दावडी गावातील गणेशमूर्तींनाही या प्रदूषणाचा फटका बसला होता. मोठ्या मूर्तीसह पूजेची छोटी मूर्ती प्रदूषणामुळे काळवंडली होती. मूर्तीला पुन्हा रंग देण्यात आला होता, पण त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता. आता पुन्हा एकदा तेलमिश्रित पाऊस पडल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.