ठाणे : लोकमान्यनगर येथील एका शाळेतील महिला कर्मचाºयाने रात्रीच्या सुमारास शाळेच्या वर्गात भारतीय चलनातून बाद झालेल्या जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांसह सध्या चलनात असलेल्या १००, ५० रुपयांच्या नोटा जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या नोटा जप्त केल्या. त्याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर पाडा नं. ४ मध्ये स्वच्छंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पंचशील विद्यालय या शाळेतील एका वर्गातून धूर निघत होता. त्यामुळे शेजारी राहणाºया रहिवाशांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी शाळेतीलच एक महिला कर्मचारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या तसेच सध्या चलनात असलेल्या शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा जाळत असल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांना पाहून ती महिला गडबडली आणि घाईगडबडीत बाहेर येऊन खोलीला टाळे ठोकून तिने धूम ठोकली. मात्र, रहिवाशांनी दरवाजा उघडून नोटांना लावण्यात आलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तेथे दोन गोण्या भरून नोटा असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी त्वरित पोलिसांना पाचारण केले. वर्तकनगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून घडलेला प्रकार पाहिला आणि जाळण्यात आलेल्या नोटा तसेच नोटांनी भरलेल्या दोन गोण्या ताब्यात घेतल्या.दरम्यान, या प्रकाराबाबत अनेक प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केले आहेत. त्या महिला कर्मचाºयाने हे पैसे का जाळले? चलनातून बाद झालेल्या पाचशे-हजारच्या नोटा शाळेत कशा काय? बाद नोटांबरोबरच नव्या नोटाही का जाळण्यात आल्या? शाळेत एवढी रक्कम कशी आली, असे सवाल उपस्थित केले आहेत.त्या संबंधित शाळेतील त्या संस्थेचे संचालक एच.बी. पवार यांच्याशी मोबाइल फोनवरून संपर्क साधला असता मोबाइलची रिंग वाजत होती. मात्र, त्यांनी मोबाइल न उचलल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.जाळलेल्या नोटांना वाळवी लागलेली आहे. तसेच त्या रद्दीत होत्या. जाळलेल्या सर्व नोटा जप्त केल्या असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. त्या नोटांमध्ये जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आहेत. त्याचबरोबर १००, ५०, १० व ५ रुपयांच्या नोटा असून जवळपास ते हजारो रुपये आहेत.- प्रदीप गिरधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे
शाळेच्या वर्गखोलीत जाळल्या जुन्या पाचशे, हजारच्या नोटा, ठाण्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:48 PM