पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी कल्याणचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:32 AM2018-02-19T04:32:19+5:302018-02-19T04:32:28+5:30
सध्या गाजत असलेल्या पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी कल्याण पूर्वेतील एका चाळीत राहात असल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे.
कल्याण : सध्या गाजत असलेल्या पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी कल्याण पूर्वेतील एका चाळीत राहात असल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे. अनियाश शिवरमन नायर असे त्याचे नाव असून शुक्रवारी दुपारी सीबीआयचे पथक या चाळीत धडकले. मात्र, आरोपी फरार झाला आहे. आरोपी गीतांजली जेम्स कंपनीच्या ‘गिल्ली’चा डायरेक्टर आहे.
पीएनबी बँकेने काही दिवसांपूर्वी गीतांजली ग्रुपविरोधात तक्रार दिली होती. गीतांजली जेम्स कंपनीचे गीतांजली, नक्षत्र व गिल्ली असे तीन विभाग असून ते हिºयांचे दागिने तयार करतात. मेहूल यांच्या गीतांजली ग्रुप कंपनीच्या डायरेक्टर्समध्ये अनियाश शिवरमन नायर हादेखील आहे. या प्रकरणी सीबीआयने केलेल्या आरोपींमध्ये नायर याचादेखील समावेश आहे. नायर याने कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात संजीव कॉलनी येथील चाळ क्र. २ असा पत्ता दिला आहे. मात्र, मोठ्या कंपनीत संचालकपदावर काम करणारा माणूस चाळीत कसा राहतो, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याने या घरात भाडेकरू ठेवल्याचे समोर आले असून नायर आपल्या कुटुंबासह चिंचपाडा परिसरातील ‘सद्गुरूधाम’ या सोसायटीतील ‘बी’ विंग, रूम नंबर ५०२ मध्ये राहतो. सध्या नायर फरार असून त्याच्या घरी पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी त्याच्या कुटुंबाने बोलण्यास नकार दिला.