बदलापूर : लॉकडाउनच्या काळात बळीराजाला गावात येऊन बियाणे व खत घेण्यात अडचणी निर्माण होतील. ही अडचण लक्षात घेऊन सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खतवाटप हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत अंबरनाथ तालुक्यातील कृषी विभागाने आतापर्यंत दीड टन भाताचे बियाणे तर चार टन खताचे वाटप गावागावांत जाऊन केले आहे. येत्या आठवड्यात तूरडाळीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात डाळ आणि भाताचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने भात आणि डाळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्याचा बळीराजाचा प्रयत्न आहे.
चरगाव येथे बियाणे व खतवाटप कार्यक्रम झाला. तालुका कृषी अधिकारी सुवर्णा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच बेबीताई कडाळी, शेतकरी गटप्रमुख प्रकाश कडाळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश पडते, कृषी सहायक सचिन तोरवे, अमर वरकडे आदी उपस्थित होते.लॉकडाउनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या गरजूंच्या दारात ज्या तत्परतेने जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात आल्या, त्याच पद्धतीने कृषी विभागाच्या वतीने सध्या शेतकऱ्यांच्या घराजवळ आवश्यक बियाणे आणि खत पोहोचवले जात आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. त्यामुळे मागणीनुसार भातबियाणांच्या विविध जाती आणि खत वितरण सुरू झाले आहे. यंदा भात बियाण्यांबरोबरच तुरीचे बीजही शेतकºयांना दिले जात आहे.
सध्या अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन कृषी कर्मचारी शेतकºयांच्या मागणीनुसार बियाणे आणि खत देत आहेत. शेतकºयांच्या मागणीनुसार गावानुसार याद्या करून टेम्पोमधून बियाणे थेट त्यांच्या गावात दिले जात आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने ५० टक्के अनुदानात कर्जत-७, कर्जत-२, जया आणि रत्ना या जातीचे भातबियाणे शेतकºयांना दिले जाणार आहे.
बाजारात गेलो असतो तर भाडे व वेळ गेला असता. मात्र, गावात बियाणे व खत मिळाल्याने, तेही स्वस्त आणि योग्य दर्जाचे मिळाल्याने समाधान वाटत आहे.- प्रकाश कडाळी, शेतकरी गटप्रमुख