जळगावच्या व्यावसायिकाचे एक लाख रुपये ठाण्यातील हॉटेलमधून लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 08:29 PM2018-01-05T20:29:03+5:302018-01-05T20:33:14+5:30
व्यावसायिक कामानिमित्त ठाण्यात आलेल्या जळगावच्या एका बांधकाम व्यावसायिकाचे एक लाख रुपये ठाण्यातील एका हॉटेलमधून चोरी झाले.
ठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या जळगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे एक लाख रुपये गुरुवारी रात्री हॉटेलमधून चोरी झाले.
जळगाव येथील काव्य रत्नावली चौकाजवळ राहणारे अक्षय श्रीराम खटोड यांनी शैक्षणिक साहित्याच्या उत्पादनासाठी भिवंडी येथील काल्हेर येथे उभारलेल्या राजलक्ष्मी इंडस्ट्रिजचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी होता. त्यासाठी गुरूवारी सकाळी ते ठाण्यात आले. आरटीओ आॅफिसजवळच्या हॉटेल शरनममधील रूम क्रमांक ४0२ मध्ये ते मुक्कामी थांबले होते. गुरूवारी दुपारी १२ वाजता ते कंपनीच्या कामासाठी काल्हेर येथे गेले. एक लाखाची हॅण्डबॅग त्यांनी रूममध्येच ठेवली होती. रात्री ९.३0 वाजता ते हॉटेलमध्ये परत आले. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बॅगमधील सामान नीटनेटके भरून ठेवत असताना हॅण्डबॅगमधील एक लाख रुपये गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. खटोड यांनी याप्रकरणी शुक्रवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी प्रथमदर्शनी हॉटेलमधील कर्मचाºयांवर संशय येत असला तरी, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि सखोल चौकशी केल्याशिवाय काही सांगणे कठिण असल्याचे तपास अधिकारी अनिकेत पोटे यांनी सांगितले.
अक्षय खटोड यांनी गुरूवारी दुपारी हॉटेलच्या रूममधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचे रात्री घालण्याचे कपडे बॅगवर ठेवले होते. रात्री ते रूमवर परतले तेव्हा त्यांचे कपडे बॅगवर नव्हे तर टेबलवर होते. हा फरक त्यांच्या लक्षात आला होता. मात्र हा बदल त्यांनी गांभीर्याने घेतला नाही. खटोड यांच्या अनुपस्थितीत रुममध्ये साफसफाईसाठी आलेल्या हॉटेलच्या कर्मचार्याने चोरी केली की आणखी कुणी, हे तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल.