आपसातील वादातून ठाण्यात तलवारीने वार करुन एकाचा खून
By सुरेश लोखंडे | Published: December 10, 2023 07:26 PM2023-12-10T19:26:34+5:302023-12-10T19:27:12+5:30
दोघे हल्लेखोर पसार: कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा.
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपसातील वादातून तलवारीने वार करुन दोन अनोळखींनी सतिश एकनाथ पाटील (५५, रा. देवदयानगर, ठाणे) यांचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला असून यातील दोघा हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी रविवारी दिली. या घटनेत भूषण पाटील (४०) हेही गंभीर जखमी झाले आहेत.
घोडबंदर रोडवरील ओवळा, विहंग व्हॅली सर्कल भागातून सतिश पाटील आणि भूषण पाटील (रा. आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे) हे दोघे एका मोटार कारमधून ९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जात होते. त्याच दरम्यान पूर्ववैमनस्यातून त्यांच्या कारमध्ये दोन अनोळखींनी शिरकाव केला. त्यांच्यापैकी सतिश पाटील यांच्यावर तलवारीसह तीक्ष्ण हत्यारांनी डोक्यावर, छातीवर , हातावर, गळयावर आणि तोंडावर वार केले. यात मध्यस्थी करीत प्रतिकार करणाºया भूषण पाटील यांच्यावरही या हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनाही मारहाण करीत त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चॉपरने वार करुन त्यांना जखमी केले.
दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सतीश पाटील यांचा मृत्यू झाला. तर भूषण यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपींना पकडण्यासाठी एका पथकाची निर्मिती केली असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.