ठाणे : लोकमान्यनगर आणि इंदिरानगर भागात चालणाऱ्या आॅनलाइन जुगार अड्ड्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री धाड टाकून १५ जणांना अटक केली. यामध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना आॅनलाइन जुगाराची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील जुगार अड्ड्यावरून चौघांना तर वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील इंदिरानगर येथील अड्ड्यावरून ११ जणांना ताब्यात घेतले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे धाडसत्र राबविण्यात आले. या धाडसत्रात माजी नगरसेविका राधा फतेबहाद्दूर यांच्या मुलालाही अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत वर्तकनगर आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
११ जुगाऱयांकडून ४६ हजारांचा ऐवज जप्तवागळे इस्टेट भागातील नितीन कंपनीजवळ आॅनलाइन रोलेट जुगार खेळणाऱ्या वैभव मंडलिक याच्यासह ११ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजार ९८० रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नितीन कंपनीजवळील ‘गजानन हाईट्स’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आॅनलाइन रोलेट जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने १५ आॅक्टोबर रोजी रात्री कारवाई केली.या कारवाईत आठ हजार १८० च्या रोकडसह सात संगणक, एक सीपीयू, एक टीपी लिंक कंपनीचा इंटरनेटचा राऊटर असा सुमारे ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. याठिकाणी जुगार चालविणाºया वैभव मंडलिक याच्यासह ११ जणांना अटक केली आहे.