ठाणे : लायसन्स, वाहन परमिट किंवा वाहनांसंदर्भातील छोट्यामोठ्या कामांसाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, ती गर्दी आता परिवहन विभागामार्फत सुरू केलेल्या ऑनलाइन पद्धतीमुळे कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. सद्य:स्थितीत ९५ टक्के आरटीओचे कामकाज आॅनलाइन पद्धतीने सुरू असल्याने गर्दीचे प्रमाण साधारणत: ७० टक्के कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जी काही गर्दी दिसत आहे, ती आॅफलाइनने होणाऱ्या कामांमुळेच असल्याचा दावा आरटीओने केला आहे.
वाहन चालवण्यासाठी कच्चे असो वा पक्के लायसन्स, वाहनांचा कर, वाहन परमिट या किंवा अन्य कामांसाठी यापूर्वी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन काम करावे लागत होते. त्यामुळे आरटीओ कार्यालय नेहमी वर्दळीचे ठिकाण होऊन बसले होते. मात्र, २०१८ साली ठाणे आरटीओ कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने कामकाज सुरू झाले. त्यामुळे नागरिकांना लायसन्ससंदर्भात परीक्षेची तारीख असो किंवा त्याचे पैसे भरण्याचे काम असो, घरी बसूनच करणे शक्य झाले. हळूहळू वाहनांचा कर, परमिट इत्यादी कामे आॅनलाइन पद्धतीने सुरू झाली. मागील दोन वर्षांत आरटीओतील ९५ टक्के कामकाज आॅनलाइन पद्धतीने सुरू झाल्याने नागरिकांना आरटीओ कार्यालयात येण्याची गरज भासत नसल्याने गर्दी कमी झाली आहे. आरटीओमध्ये हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकाच कारभार हा आॅफलाइन पद्धतीने सुरू आहे. ही गर्दी भविष्यात आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आॅनलाइन पद्धतीच्या कामामुळे नागरिकांचा वेळ आणि त्यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रासही कमी होण्यास मदत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दंडाचे चलन, व्हीआयपी नंबर तसेच इतर राज्यांतून आणलेल्या वाहनांवरील कर भरणे, यासारख्याच काही सेवांचे कामकाज अद्यापही आॅफलाइन आहे. उर्वरित सर्व सेवांचे कामकाज आॅनलाइन सुरू झाल्याने ते काम घरी बसून होत आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे