भाजपाविरोधात विरोधकांची अभद्र आघाडी - रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:52 AM2017-12-09T00:52:25+5:302017-12-09T00:52:44+5:30
‘देशात भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या विचित्र युती, आघाडी आकाराला येत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही अभद्र आघाड्या जन्माला आल्या आहेत
भिवंडी : ‘देशात भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या विचित्र युती, आघाडी आकाराला येत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही अभद्र आघाड्या जन्माला आल्या आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केली. जिल्हा परिषदेत भाजपा आघाडीची सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला.
ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्ताने ते तालुक्यातील गोवेनाका येथे प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांमुळे भाजपाला मतदारांची पसंती मिळत आहे. तीन वर्षांत जिल्ह्यातील विकासकामांमुळे भाजपाला महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले आहे. त्यामधून तळागाळासह ग्रामीण भागाचा विकास होत आहे. मात्र, विकासकामांना विरोध करत भाजपाला रोखण्याचा विरोधी पक्षांकडून झालेला प्रयत्न यशस्वी होणार नाही. पालघर जिल्हा परिषदेप्रमाणेच ठाणे जिल्हा परिषदेतही भाजपाला यश मिळेल, असा दावा त्यांनी केला. शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपालाच निवडून द्यावे, असे आवाहन दानवे यांनी केले.
भाजपा, श्रमजीवी संघटना आणि रिपब्लिकन पक्ष या महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तालुक्यातील गोवेनाका येथे झालेल्या प्रचारसभेला अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड आदी उपस्थित होते.
सोशल मीडियावर उमेदवारांचा अधिक भर
बदलापूर : अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. ग्रामीण भागात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. तसेच चौक सभा आणि प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंबरनाथ तालुक्यात दोन गण आणि एका गटातील उमेदवारांच्या उमेदवारीला हरकत घेतल्याने त्या जागा सोडून इतर जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारांनी प्रचारफेºयांवर भर दिला असून प्रचारफेरीतील गर्दीचे फोटो सोशल मीडियावर टाकून उमेदवारांना जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि यू ट्युबवर व्हिडीओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे. या प्रचारातून बदनामी, खोटी माहिती, आचारसंहिता भंग करणाºया पोस्ट आणि समाजस्वास्थ्य बिघडवणारे संदेश पसरवले जाऊ नयेत, यासाठी निवडणूक निरीक्षकांनी मोठी तयारी केली आहे. राजकीय नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. तर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात समाजमाध्यमांतील प्रचारावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती निवडणूक निरीक्षक आणि पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.त्यांनी नुकतीच अंबरनाथ तहसील कार्यालयात निवडणूक कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली होती. अवघे तीनच पक्ष सहभागी असल्याने सामान्य वातावरणात निवडणुका पार पडतील, अशी आशाही बोरीकर यांनी व्यक्त केली. तसेच अंबरनाथ तालुक्यातील तयारी पूर्ण झाली असून परवानगी कक्ष, आचारसंहिता पथक, भरारी पथके नेमण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.