मुंब्रा बायपास दुरुस्तीसाठी पर्यायी रस्त्यांच्या पाहणीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:14 AM2018-04-27T03:14:08+5:302018-04-27T03:14:08+5:30
मुंब्रा बायपास रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
ठाणे : मुंब्रा बायपासवरील वाहनांना पर्यायीमार्गे सोडण्यापूर्वी प्रथम त्या रस्त्यांची दुरुस्ती व आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश ठाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नरनावरे यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक व पोलीस यंत्रणेला दिले. पर्यायी रस्त्यांची पाहणी करून सुधारणा करण्यासंबंधीचा अहवाल तातडीने देण्याचे फर्मान त्यांनी बांधकाम विभागास सोडले.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. मुंब्रा बायपास रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक मंगळवारीच अन्यमार्गे वळवण्याचे वाहतूक विभागाने घोषित केले होते. मात्र, पर्यायी मार्गांची अवस्था दयनीय असल्यामुळे संभाव्य अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे व पालघर पोलीस अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले आणि जिल्हाधिकाºयांकडून हव्या असलेल्या अधिसूचनेला विलंब झाला.
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातून जाणाºया वाहनांसाठी पर्यायी रस्ते दुरुस्त करणे, वाहतूक नियंत्रक स्वयंसेवकाची गरज, ठिकठिकाणचे विद्युतीकरण या मुद्यांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. यामुळे होत असलेल्या विलंबासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संभाजी पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, बांधकाम विभागास तातडीने पर्यायी रस्त्यांच्या दुरुस्ती व आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या रास्त मुद्यांना विचारात घेऊन अधिसूचना काढली जाईल.