ठाण्यातील दहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: October 16, 2020 07:38 PM2020-10-16T19:38:04+5:302020-10-16T19:41:38+5:30
गेली अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पोलीस उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने १ आॅक्टोबर रोजी काढले होते. आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत. वागळे इस्टेट विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश निलेवाड आणि डोंबिवलीचे जयराम मोरे आदींचा यामध्ये समावेश आहे.
गेली अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पोलीस उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने १ आॅक्टोबर रोजी काढले होते. तब्बल १०५ अधिकाऱ्यांपैकी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला सहा सहाय्यक आयुक्तांची तर ठाणे ग्रामीणसाठी दोन आणि पालघर जिल्हयासाठी एका उपअधीक्षकाच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या गृहविभागामार्फत काढण्यात आले. ठाणे शहर मधील चार तसेच इतर अशा दहा सहायक आयुक्तांना नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त फणसळकर यांनी काढले आहेत. वागळे इस्टेट विभागाचे निलेवाड यांना आता विशेष शाखा-१ मध्ये आणण्यात आले आहे. तर विशेष शाखेचे बजबळे यांना वागळे इस्टेट विभागात संधी मिळाली आहे. प्रशासन विभागातील दत्ता तोटेवाड यांची उल्हासनगरच्या वाहतूक शाखेत बदली झाली आहे. मुख्यालयातील उमेश पाटील यांनाही कल्याणच्या वाहतूक शाखेत नियुक्ती मिळाली. सध्या मुख्यालय एकचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे जयराम मोरे यांचीही पुन्हा डोंबिवली विभागात बदली करण्यात आली आहे.
त्याचबरोबर ठाणे जात पडताळणी विभागाच्या उपअधीक्षक संगीता अल्फान्सो यांना ठाणे शहर नियंत्रण कक्षात नियुक्ती मिळाली आहे.तर डहाणू येथून आलेल्या मंदार धर्माधिकारी यांनाही मुख्यालय -२ मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. गोंदियाचे उपअधीक्षक प्रशांत ढोले यांना भिवंडी पूर्व, तर सोनाली ढोले यांना प्रशासन विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. औरंगाबादच्या कन्नड येथून आलेल्या जगदीश सातव यांना मुख्यालय -१ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती दिल्याचे आदेशात म्हटले आहे.