- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यात खेड्यापाड्याबरोबरच अडवळणी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचीच जबाबदारी अधिक असल्याने या शिक्षकांना आपले विद्यार्थी घडविण्यासाठी वेळ कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.शाळांमधील परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. तालुक्यात इमारतींची स्थिती चांगली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी डवऱ्यातून आणलेले गाळयुक्त पाणी राहिलेले नाही. फळ्याची जागा डिजिटलने घेतली आहे. पूर्वी जुन्या मोडक्या शाळा कुणाच्या तरी घरात भरत होत्या. शेणा-मातीने सारवलेल्या कुडांच्या, जमीन असणाऱ्या जागेत भरणाऱ्या शाळा होत्या.पण आज जेवढे वर्ग तितकेच शिक्षक असे चित्र आहे. यामुळे एखादा शिक्षक आला नाही किंवा अन्य कामासाठी बाहेर जावे लागले तर मुलांचे नुकसान होते. यासाठी शिक्षकांची पदे भरण्याची ग्रामीण भागात गरज आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक शाळा या एक शिक्षकी असल्याचे दिसून आले आहे; पण त्याव्यतिरिक्त अधिक कामे असल्याने शिक्षक हा शिक्षक नसून कारकून झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४५७ शाळा आहेत. यामध्ये ११०० शिक्षक काम करीत आहेत. पैकी आजमितीस एक शिक्षकी २० शाळा असून, दोन ते तीन वर्गांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांची इच्छा असूनही त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देता येत नाही.कोविडसारख्या महामारीत केंद्रांवर रुग्णांची माहिती भरण्यापासून कामे करून घेतली. शाळेची स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष या सर्वच गोष्टी शिक्षकांना कराव्या लागत असून, याच्या नोंदी ठेवणे आदी कामे करावी लागतात. इतकेच नव्हे, तर सध्या शिक्षकांना गावामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबविताना गावकीच्या कामाचीही जबाबदारी त्यांच्यावरच टाकत असल्याने त्यांचा व्याप वाढला आहे. त्यामुळे शिक्षक आपल्या खऱ्या कामापासून बाजूला होत असल्याचे दिसून येते. एक शिक्षकी शाळांचे हालदापूर माळ, वुंबर वाडी, लाद्याची वाडी, खोक्रीची वाडी, कांबे, पाचघर, वालशेत, बांगर वाडी, माल, शिदवाडी येथील शाळा एक शिक्षकी आहेत. यामागे कारणेही तशीच आहेत. काही शाळेतील शिक्षक निवृत्त झाले आहेत, तर काही शाळांमधील शिक्षकांचे निधन झाले वा जिल्ह्यात अन्य शाळेत बदली झाल्याने ही समस्या आहे. शासकीय योजनांचे ओझेतालुक्यामध्ये आतापर्यंत साधारण २२ हजार २०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच तीन वर्षांपूर्वी सरकारने आठवीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडला. मात्र, त्यासाठी वेगळ्या शिक्षकाची नियुक्ती न केल्याने अनेक शाळांमध्ये वर्गसंख्येपेक्षा शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यातच गावातील शिक्षकांना अनेक प्रकारची कामे दिली गेल्याने त्यांचा अधिक वेळ त्यातच खर्च होतो. त्यामुळे शिकविण्यासाठी हवा तितका वेळ देता येत नाही असे शिक्षकांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा यासारख्या निवडणुकांमध्ये शिक्षकांना कामे करावी लागतात. तर मतदार नोंदणीकरिता या शिक्षकांनाच गावपाड्यांवर फिरावे लागते.गावाची स्वच्छता, आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या पोषण आहाराची संपूर्ण माहिती शिक्षकांना ठेवावी लागते. शाळेव्यतिरिक्त कामे बंद करावीत. एक शिक्षकी शाळांना आठवीचे वर्ग जोडल्याने सरकारने शिक्षकांची नियुक्ती केल्यास आहे त्या शिक्षकांवर ताण न येता शिकविण्याचे काम अधिक व्यवस्थित करता येईल.- सुरेश विशे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती.शहापूर तालुक्यामध्ये २० शाळा या एक शिक्षकी आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. त्यामुळे त्या शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत. अधिकचे शिक्षक मिळाल्यास हाही प्रश्न कायमचा सुटेल.- हिराजी वेखंडे प्र. गटशिक्षणाधिकारी, शहापूर
शिक्षकांवर इतर कामांचेच ओझे, जिल्हा परिषद शाळांची स्थिती : कमी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:00 AM