पालघर : जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गट, पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे 50 कोंबड्यांचा गेल्या तीन दिवसांपासून संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पुण्यात तपासणीसाठी पाठविलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे निश्चित झाले आहे.
प्रशासन सतर्क झाले आहे. हा बर्ड फ्लूचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त होत असून मृत पक्षाचे अवशेष तपासणीसाठी पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. पालघर शहरातील सुर्या कॉलनीमध्ये असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फॉर्ममध्ये गेल्या तीन दिवसात 50 कोंबड्यांचा अचानक तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एकामागोमाग अचानक या कोंबड्याचा मृत्यू झाल्याने या पोल्ट्री फॉर्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तो सील करण्यात आला आहे. या 50 कोंबड्या दगावल्याने पोल्ट्री फॉर्ममध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारत करीत पोल्ट्री फार्म सील करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पुणे येथे पाठविण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला असून कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लू मुळेच झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
बर्डफ्लूचा शिरकाव झाल्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याने या रोगाला जिल्ह्यात अधिक पसरू न देता प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना आखित असल्याचे जिल्हा परिषद पशुधन अधिकारी डॉ. हिरवे यांनी 'लोकमत'ला सांगितले.