लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. महापालिका हद्दीबाहेरील कोरोना रुग्णही शहरातील खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मनपा हद्दीतील आणि अन्य ठिकाणच्या काेराेना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचेही अंत्यसंस्कार कल्याण-डोंबिवली शहरांतील सहा स्मशानभूमींमध्ये केले जाते, तसेच अन्य आजारांनी मृत होणाऱ्यांचे अंत्यसंस्कारही तेथे होत असल्याने सध्या स्मशानभूमींवरील ताण कमालीचा वाढला आहे. एप्रिलमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहता कोरोनासह अन्य आजारांमुळे मृत झालेल्या सुमारे १७०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
कल्याण-डोंबिवलीत ६२ स्मशानभूमी आहेत. शहरातील बैल बाजार, प्रेम ऑटो, लालचौकी, विठ्ठलवाडी, पाथर्ली, शिवमंदिर या स्मशानभूमींमध्ये गॅस शवदाहिनी आणि लाकडावर जाळण्यासाठी लागणारे बर्निंग स्टॅण्ड असल्याने येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. या स्मशानभूमीत प्रत्येकी एक गॅस शवदाहिनी आहे, तर बैल बाजारमध्ये ४, प्रेम ऑटो ४, लालचौकी ५, विठ्ठलवाडी ७, पाथर्ली ३, शिवमंदिर स्मशानभूमीत १० बर्निंग स्टॅण्ड आहेत. या सहा स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याचे प्रमाण अधिक आहे. याव्यतिरिक्त अन्य स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी १ ते दोन असे ११२ बर्निंग स्टॅण्ड आहेत. यातील काही ग्रामीण पट्ट्यात असल्याने त्याचा वापर स्थानिक करतात. महिनाभरात आतापर्यंत केडीएमसी हद्दीतील तब्बल ११९ जणांनी काेराेनामुळे आपला जीव गमावला आहे, तसेच अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, टोकावडे, शहापूर येथील रुग्णही कल्याण-डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची नाेंद केडीएमसीकडे न होता ते जिथले मूळ रहिवासी आहेत, तेथील स्थानिक आरोग्य केंद्राकडे होते. मात्र, त्यांच्या मृतदेहांवर केडीएमसी हद्दीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे केडीएमसी हद्दीतील स्मशानभूमींवर ताण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे.
---------------------------
लाकडांवरही कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार
कोरोना मृतांवर गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात; पण त्यावर पडणारा भार आणि होणारे तांत्रिक बिघाड पाहता केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लाकडावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली आहे. काेराेना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी काेणतेही शुल्क आकारले जात नाही. दरम्यान, कोरोनाव्यतिरिक्त इतर शव दहन करण्यासाठी २५०० रुपये फी आकारली जाते. फी आकारणीबाबत काही तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे फलकही स्मशानभूमीत लावले आहेत, अशी माहिती केडीएमसीच्या शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांनी दिली.
---------------------
फोटो आहे