पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 3, 2023 11:46 AM2023-10-03T11:46:58+5:302023-10-03T11:47:26+5:30
प्रभावी बोलणाऱ्याचे विचार थेट मनापर्यंत पोहोचतात - वामन केंद्रे
ठाणे : महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची असलेल्या कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यंदा मुलींनी बाजी मारली आहे. बारापैकी दहा पारितोषिके मुलींनी जिंकली असून पदवी गटात नाशिकची श्रुती बोरस्ते तर कनिष्ठ महाविद्यालय गटात मुंबईची स्वरा पाटील विजयी झाली आहे. विजयी स्पर्धकांना ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी पारितोषिके प्रदान केली.
ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पदवी गटात श्रुती बोरस्ते, एच पी टी कला महाविद्यालय, नाशिक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नियोजित भाषणासाठी असलेले विशेष पारितोषिकही तिला मिळाले. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातील यश पाटील याला दुसरा क्रमांक मिळाला. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील सुप्रीम मस्कर याला तिसरा क्रमांक मिळाला. तर, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची मुग्धा थोरात हिला उत्तेजनार्थ तसेच उत्स्फूर्त भाषणासाठी दिले जाणारे विशेष पारितोषिक मिळाले. कनिष्ठ महाविद्यालय गटात रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या स्वरा पाटील हिला प्रथम तसेच उत्स्फूर्त भाषणासाठी दिले जाणारे विशेष पारितोषिकही मिळाले. दुसरा क्रमांक आणि नियोजित भाषणासाठी दिले जाणारे विशेष पारितोषिक व्ही. जे. वझे महाविद्यालयाच्या अलीशा पेडणेकर हिला मिळाले. तिसरा क्रमांक रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या आभा भोसले हिला मिळाला. कर्जत येथील अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील तेजस्वी ठमके हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी बोलणे ही कला असून भाषण औपचारिक असू नये असे प्रतिपादन केले. स्पर्धकांचे परीक्षण डॉ. शरद धर्माधिकारी, वृंदा दाभोळकर, रवी घोडचर आणि विशाखा विश्वनाथ यांनी केले. परीक्षकांचा परिचय समिती सदस्य डॉ. राजश्री जोशी आणि पौर्णिमा जोशी यांनी करून दिला. तसेच, परीक्षकांचा सत्कार मंडळाचे विश्वस्त निशिकांत साठे आणि अनिल हजारे यांनी केला.