पनवेल - मावळ लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या पनवेल मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत रंगत असताना पनवेल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केलेली दहा लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे.पनवेल तालुक्यातील वावंजा गावात राहत असलेले सेनेचे पदाधिकारी परेश पाटील यांनी यांनी महावितरणची फसवणुक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या वाशी येथील भरारी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. विज विभागाचे सहाय्यक अभियंता कपिल गाठले यांनी बुधवार दि.8 रोजी दुपारी पावणे एकवाजता पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार वावंजा गावातील परेश पाटील व त्यांच्या पत्नीने 30 हजारांपेक्षा जास्तीच्या वीज युनिटची चोरी केल्याची तक्रार पोलीसांना दिली. परेश पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पनवेल ग्रामीणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. महावितरण कंपनीच्या तक्रारीनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात परेश पाटील व त्यांच्या पत्नीविरोधात वीजचोरी केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.