कल्याण : पश्चिमेतील दूधनाका परिसरातील जामा मशिदीला लागून असलेल्या फंगारी इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी ३ वाजता कोसळून रिक्षावर पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.हनीफ फंगारी यांची दोन मजली फंगारी निवास ही ६५ वर्षे जुनी इमारत आहे. इमारतीच्या मागचा भाग मजबूत आहे. मात्र, पुढील भाग कमकुवत झाल्याने तो इमारतीनजीक उभ्या केलेल्या फारुख खोत यांच्या रिक्षावर पडला. त्यामुळे रिक्षेचे नुकसान झाले आहे. फारूख हा दुपारी जेवण करण्यासाठी घरी गेला होता. त्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे इमारतीत राहणाऱ्या तीन कुटुंबीयांना त्यांची घरे तसेच बेकरी आणि किराणा दुकानमालकास त्यांची दुकाने रिकामी करण्यास महापालिकेने सांगितले आहे.
दरम्यान, फंगारी इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतीही पडण्याच्या स्थितीत आहेत. त्याचबरोबर नवनाथनगरातील परिसीमा इमारतीच्या संरक्षक भिंतीचा भाग अंकुश चाळ परिसरात कोसळला आहे. या घटनेतही जीवितहानी झालेली नाही. अर्धवट पडलेली संरक्षक भिंत पूर्णपणे पाडण्यासाठी माजी शिवसेना नगरसेवक रवी पाटील यांनी अग्निशमन दल व प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार, प्रभाग अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह भिंत पूर्णपणे पाडण्याची कारवाई केली.