उल्हासनगर पालिकेत पेनडाऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:53 AM2021-03-03T00:53:32+5:302021-03-03T00:53:41+5:30

भाजप नगरसेवकांची दबंगगिरी : शहर अभियंत्यासोबत घातला वाद

Pendown agitation in Ulhasnagar Municipality | उल्हासनगर पालिकेत पेनडाऊन आंदोलन

उल्हासनगर पालिकेत पेनडाऊन आंदोलन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहर अभियंता  महेश शितलानी यांच्याशी भाजप नगरसेवकांनी सोमवारी वाद  घालत आरडाओरडा केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. यावेळी कामगार नेते राधाकृष्ण साठे यांची मध्यस्थी अयशस्वी झाल्यावर नगरसेवकांच्या दबंगगिरीच्या निषेधार्थ कामगार संघटनेने मंगळवारी पेनडाऊन आंदोलन करून नगरसेवकांच्या दबंगगिरीचा निषेध केला. 
बांधकाम विभागाकडून भाजपच्या १३ नगरसेवकांची विकासकामे होत नाही याचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व नगरसेवक प्रदीप रामचंदानी असे तिघे सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान बांधकाम विभागात गेले. शितलानी यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांच्यात वाद झाला. 
यावेळी सर्वाधिक आवाज रामचंदानी यांचा येत असल्याने, महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेले कामगार नेते साठे तेथे गेले. त्यांनी रामचंदानी यांना समजावत आरडाओरड करू नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शितलानी हे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यासोबत विकासकामे पाहण्यासाठी निघून गेले.
रामचंदानी यांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ मंगळवारी कामगारांनी पेनडाऊन आंदोलनाची हाक दिली. दुपारपर्यंत कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र दुपारनंतर आयुक्तांच्या विनंतीला मान देत काम सुरू केल्याची माहिती साठे यांनी दिली. 
नेहमी वादात राहिलेल्या बांधकाम विभागाला अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळालेला नाही. शितलानी यांच्याकडे शहर अभियंता पदासह बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा प्रभारी पदभार दिला आहे. दरम्यान, शितलानी यांची तब्येत बरोबर नसल्याने ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पालिकेच्या सर्वच विभागात सावळागोंधळ असल्याने कारभारावर येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेत कुणाचेच नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कामाबाबत चर्चा करणे गैर आहे का?... रामचंदानी यांचा सवाल
भाजप नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलो तर गैर काय?. चर्चेवेळी आरडाओरड झाली. कामगार संघटनेने यामध्ये पडणे कितपत योग्य आहे?. असा प्रश्न भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला.

Web Title: Pendown agitation in Ulhasnagar Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.