मुरलीधर भवार कल्याण : अहमदाबाद येथे आकाशपाळणा अचानक तुटल्याने दोन जणांचा मृत्यू तर पंधराजण जखमी झाल्याची घटना ताजी असताना आपल्याकडेही आकाशपाळण्याविषयी परवानग्या देताना सरकारी यंत्रणा केवळ कार्यालयात बसूनच परवानग्या देते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आपल्याकडील फन फेअर, उत्सव, आनंदमेळे, जत्रा यामध्ये उंच आकाशात जाण्याचा ‘आनंद’ घेणे, हे आपल्या जीवावर बेतू शकते. सरकारी यंत्रणा परवानग्या देऊन नामानिराळ्या होतात. त्यानंतर, एखादा अपघात घडल्यास त्याची सगळी जबाबदारी आकाशपाळणाचालकाच्या गळ्यात टाकून मोकळे होतात.
उंच आकाशपाळणा उभारण्याकरिता महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून परवानगी दिली जाते. ती उत्सव आयोजकाला आयोजन करण्यासाठी दिली जाते. त्या जागेचे मालमत्ता विभागाकडून परवाना शुल्क आकारले जाते. आयोजकांनी त्या जागेत आकाशपाळणा उभारायचा की, अन्य काही खेळण्यांचे प्रकार ठेवायचे, हा आयोजकांचा प्रश्न आहे. त्याठिकाणी काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आयोजकांसह आकाशपाळणा उभारणाऱ्यावर निश्चित केली जाते. आकाशपाळणा हा किमान ८० फूट उंच असतो. एका आकाशपाळण्यात २४ सीट असतात. एका सीटवर चारजण बसतात. नव्या पद्धतीचा ३२ सीटचा आकाशपाळणाही काही ठिकाणी उभारला जात आहे.
हा व्यवसाय करणारे मुन्ना खंडेलवाल यांनी सांगितले की, आकाशपाळणा उभारण्यासाठी पोलीस परवानगी घ्यावी लागते. अग्निशमन दलाकडून नाहरकत दाखला घ्यावा लागतो. त्याचबरोबर आयोजक महापालिकेची परवानगी घेतात. सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही नाहरकत दाखला घ्यावा लागतो. हा दाखला देताना त्यात एक ओळ सर्वात शेवटी लिहिलेली असते. आकाशपाळण्याची फिटिंग झाल्यावर कार्यालयाशी संपर्क साधावा. यात दुहेरी अर्थ असला, तरी ती झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकारी जागेवर जाऊन आकाशपाळण्याची पाहणी करील, असे त्यातून अभिप्रेत आहे. एकाही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत नाहीत. या नाहरकत दाखल्यास ७०० रुपयांची पावती फाडावी लागते. पोलीस परवानगीकरिता काही पैसे लागत नाहीत. मात्र, अग्निशमन दलास नाहरकत दाखल्याकरिता ३२०० रुपये भरावे लागतात. महापालिकेस आयोजकाला चौरस फुटांच्या दरानुसार जागेचे भाडे भरावे लागते. ते आयोजक पाळणाचालकाकडून काही अंशी घेतो.
पैसे उकळले जातात...सगळ्याच खात्यांकडून आकाशपाळणाचालकाकडून जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते. तेव्हाच परवानग्या दिल्या जातात. रीतसर परवानग्या घेऊन अपघात झाल्यास पाळणाचालकाला जबाबदार धरले जाते.सरकारी यंत्रणा नामानिराळ्या राहतात. सध्या विविध अॅडव्हेंचर पार्कमुळे आकाशपाळण्याची क्रेझ कमी झाली आहे. मुंबई उपनगरांसह बड्या शहरांत आणि ग्रामीण भागातील मोठ्या जत्रेत आकाशपाळणे लावले जातात.आकाशपाळण्याचा आनंद आजही लोकांना घ्यावासा वाटतो. कल्याणच्या दुर्गाडी येथे नवरात्रीत नऊ दिवस जत्रा भरते. त्याठिकाणी आकाशपाळणाचालकाकडून नऊ दिवसांकरिता जागामालक २४ लाख रुपये भाडे वसूल करतो.
मौत का कुंआवर बंदी...देशातील अन्य राज्यांत ‘मौत का कुंआ’ या जीवघेण्या खेळावर बंदी आहे. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडे सर्रास हा खेळ जत्रा आणि आनंदमेळाव्यातून आयोजित केला जातो. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. कल्याणच्या दुर्गाडीदेवीच्या जत्रेत दीड वर्षापूर्वी ‘मौत का कुंआ’ खेळात एक तरुणी जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच पाच वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी जत्रेत आकाशपाळण्यातून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर एका तरुणाचा हात जायबंदी झाला होता.
२० फूट मोकळ्या जागेचा नियम धाब्यावरज्या ठिकाणी आकाशपाळणा उभारला जाणार आहे, त्याठिकाणी चारही बाजूला २० फूट मोकळी जागा सोडली पाहिजे. एखाद्या वेळी आकाशपाळणा अडकला व चालेनासा झाल्यास अग्निशमन दलाची गाडी बोलवून शिडीच्या साहाय्याने आकाशपाळण्यातील लोकांना खाली उतरवण्यात येते. २० फूट मोकळी जागा सोडण्याचा नियम कुठेही पाळला जात नाही. पाळण्याच्या अवतीभोवतीच अन्य खेळांचे प्रकार लावले जातात. आकाशपाळणा ज्या ठिकाणी लावला जातो, त्याठिकाणी तलाव नसावा. या नियमाकडेही डोळेझाक केली जाते. आकाशपाळणा ज्या जागेवर उभारला जाणार आहे, ती जागा मातीचा भराव टाकलेली, भुसभुशीत नसावी, याची खात्री करूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने नाहरकत दाखला दिला पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात नाही.