ठाणे - आणीबाणीच्या कालावधीत बंदीवानांचा सन्मान करण्याची योजना बंद न करता कायम सुरू ठेवावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. त्याचबरोबर राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूधाचे दर व अनुदान वाढविण्याची मागणीही करण्यात आली.भाजपाचेठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, चिटणीस संदीप लेले, हर्षदा बुबेरा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची आज भेट घेऊन निवेदन दिले.
भारतीय लोकशाही कायम ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा कायम सन्मान व्हावा, या उद्देशाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीतील बंदीवानांसाठी सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेचे देशभरातून कौतूकही झाले होते. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या चांगल्या योजना बंद करण्याची मालिकाच सुरू झाली आहे. त्यानुसार आणीबाणीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून, लोकशाही कायम ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा अपमान करणारा आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला हा निर्णय अशोभनीय आहे, असे भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच लवकरात लवकर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.दूध उत्पादकांसाठी साकडेराज्यात आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. गायीच्या दूधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान आणि दूध खरेदीचा दर प्रती लिटर ३० रुपये करावा आदी मागण्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.