भंगाराच्या व्यवसायासाठी लाच मागणाऱ्या पोलीस नाईकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 12:37 AM2021-12-03T00:37:47+5:302021-12-03T00:40:17+5:30
भंगाराच्या व्यवसायासाठी शहापूरच्या एका व्यावसायिकाकडे १७ हजारांच्या लाचेची मागणी करणारा शहापूर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक किरण गोरले याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) बुधवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भंगाराच्या व्यवसायासाठी शहापूरच्या एका व्यावसायिकाकडे १७ हजारांच्या लाचेची मागणी करणारा शहापूर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक किरण गोरले याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) बुधवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर परिसरात भंगारविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ३२ वर्षीय व्यावसायिकाकडे गोरले यांनी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी लाचेची मागणी केली होती. शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भंगाराचा व्यवसाय करण्यासाठी या तक्रारदाराकडे गोरले यांनी साहेबांसाठी १५ हजार रुपये, तर स्वत:साठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार या भंगार विक्रेत्याने ठाणे एसीबीकडे केली होती. याची पडताळणी ५ नोव्हेंबर रोजी एसीबीने केली. त्याआधारे चौकशीअंती पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने १ डिसेंबर रोजी गोरले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.