ठाणे : उशिरापर्यंत सुरू राहणा-या बारचालकाच्या श्रीमुखात देऊन त्याला शिवीगाळ करणा-या श्रीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सायकर यांच्याविरुद्ध हॉटेल दुर्गा आशीर्वाद (श्रेया) चे श्यामा शेट्टी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे. तुम्हाला ठार करून कोठे गायब करू, ते कळणार नाही, अशी धमकी सायकर यांनी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाºयांना दिलेल्या तक्रारीत शेट्टी यांनी म्हटले आहे , ६ नोव्हेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास हॉटेलचे शटर अर्धे खाली ओढलेले असताना निरीक्षक सायकर हे त्यांच्या काही कर्मचाºयांसह आत आले. कॅश काउंटरवर बसलेला माझा भाऊ हरीश शेट्टी याला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्हाला हॉटेल १२.३० वाजेपर्यंत चालवण्याची परवानगी दिली आहे. तरीही, हॉटेल अजून चालू का ठेवले आहे, असे विचारून त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली.वास्तविक, राज्य शासनाच्याच एका परिपत्रकानुसार मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील हॉटेल आस्थापनांमध्ये रात्री १.३० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ तसेच मद्य पुरवण्याची परवानगी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याची कल्पना दिली, तरीही सायकर यांनी १२.३० वाजताच हॉटेल बंद करावे, असा दम दिला. समजावल्यानंतरही त्यांनी बाहेर येऊन ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. अशा घटनांमुळे हॉटेल व्यवसाय चालवणे जिकिरीचे होणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे त्यांनी म्हटले आहे. याच पत्रासोबत हरीश यांना मारहाण होत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी दिले आहे.
ठाण्यात बारचालकाला पोलिसांची मारहाण, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:06 AM