ठाणे : उशिरापर्यंत सुरु राहणा-या बार चालकाच्या श्रीमुखात देऊन त्याला शिवीगाळ करणा-या श्रीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सायकर यांच्याविरुद्ध हॉटेल दुर्गा आशिर्वाद (श्रेया) चे शामा शेट्टी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. तुम्हाला ठार करून कोठे गायब करू ते कळणार नाही, अशी धमकी सायकर यांनी दिल्याचेही त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.पोलीस आयुक्तांसह श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांना दिलेल्या तक्रारीत शेट्टी यांनी म्हटले आहे की, ६ नोव्हेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे शटर अर्धे खाली ओढलेले असतांना निरीक्षक सायकर हे त्यांच्या काही कर्मचाºयांसह आत आले. कॅश काऊंटरवर बसलेला माझा भाऊ हरिष शेट्टी याला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्हाला हॉटेल १२.३० वाजेपर्यंत चालविण्याची परवानगी दिली आहे. तरीही हॉटेल अजून चालू का ठेवले आहे? असे सांगून त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. वास्तविक राज्य शासनाच्याच एका परिपत्रकानुसार मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील हॉटेल आस्थापनांमध्ये रात्री १.३० वाजेपर्यंत खाद्य पदार्थ तसेच मद्य पुरविण्याची परवानगी असल्याचा दावाही त्यांनी या परिपत्रकाचा हवाला देऊन केला आहे. १.३० वा. पर्यंत हॉटेल बंद करण्याची अनुमती असल्याचे सायकर यांना सांगूनही त्यांनी १२.३० वाजताच बंद करण्यात यावे, असा दम दिला. याबाबत त्यांना समजावजे तरी त्यांनी बाहेर येऊन आपल्याला ठार मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.दरम्यान, पोलीस निरीक्षक सायकर यांनी हॉटेलचे पार्टनर हरीष यांना केलेल्या मारहाणीची सीसीटीव्हीतील फूटेज सोशल मिडीयातूनही व्हायरल झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.अशा घटनांमुळे हॉटेल व्यवसाय चालविणे जिकरीचे होणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असेही त्यांनी यात म्हटले आहे. याच पत्रासोबत हरीष यांना मारहाण होत असतांनाचे सीसीटीव्ही फूटेजही त्यांनी दिले आहे.
‘‘ सोमवारी पहाटे सायकर यांचे पथक गस्त घालीत असतांना त्यांना बारजवळ मोठी गर्दी दिसली. तिथे गोंधळ घालून काही मुले पळून गेली. याचीच सायकर यांनी विचारपूस केली. त्यांच्या चौकशीनंतर तिथे हाणामारीही झाली. अर्थात, सायकर यांनी जी मारहाण केली त्याबाबत तक्रार अर्ज आला आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.’’- सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे.