जितेंद्र कालेकरठाणे : येत्या बुधवारी येणाऱ्या आषाढातील अमावस्येला ‘गटारी’ साजरी होणार असल्यामुळे तळीरामांकडून जय्यत तयारी केली जात आहे. यानिमित्त हजारो लीटर मद्याची विक्री होणार आहे. परंतू, बेकायदेशीर रित्या मद्य विक्री, वाहतूक आणि सेवनावर पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही करडी नजर राहणार असल्यामुळे काही उत्साही तळीरामांची मात्र गोची होण्याची शक्यता आहे.
गटारीच्या नावाखाली जर कोणी थिल्लरपणा करीत असेल किंवा दारु पिऊन धिंगाणा घालीत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. ठाणे शहर, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट परिमंडळातील सर्वच्या सर्व ३५ पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ जुलै रोजी गटारीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंगचे आदेश देण्यात आले आहेत. येऊरसह ठाणे पोलीस आयुक्तालयातील मोक्याच्या ठिकाणी फिक्स पाँर्इंटही ठेवण्यात आले आहेत. एखाद्याला जरा जास्त किक बसली त्याने गोंधळ घातला किंवा महिलांना छेडछाडीचे प्रकार केले जर अशा ठिकाणी तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मार्केट, बियर बार, हॉटेल्स आणि मुख्य नाक्यांवर हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या नियंत्रणाखाली सर्व १८ युनिटचे अधिकारीही त्यासाठी श्वास विश्लेषक यंत्रणेसज सज्ज राहणार आहेत. मद्य प्राशन करुन दारु पिणाºयांवर कारवाई केली जाणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने येऊर परिसरात पार्टी करणाºयांवर बंदी घातली आहे. त्यामुळे पोलीस, वनविभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा तिन्ही यंत्रणांची याठिकाणी गस्त तसेच तपासणी केली जाणार आहे. ठाणे जिल्हयात १५०० बार, २५० देशी दारुची दुकाने, २५० वाईन शॉप आणि २०० बियर ची दुकाने असून या ठिकाणाहून लाखो लीटर मद्याची केवळ ३० आणि ३१ जुलै या दोन दिवसांमध्ये विक्री होण्याची शक्यता आहे.त्रास द्याल, तर पोलीस कोठडीत जाल!राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्हा अधीक्षक नितीन घुले यांच्या अधिपत्याखाली ठाण्याचे युवराज राठोड आणि कल्याणचे रवीकिरण कोल्हे या दोन उपअधीक्षकांमार्फत ठाण्याचे येऊर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ येथे ११ निरीक्षकांकडून विशेष तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय, एक भरारी पथकही तैनात आहे. सामुहिक पार्टीसाठी सात ते २० हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारून परवाना दिला जाणार आहे. पण, बेकायदेशीर पार्ट्या करणारे दारूची विक्री आणि वाहतूक करणाºयांवर विशेष करडी नजर राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गटारी जरूर साजरी करा, पण कोणालाही त्रास होणार असेल तर थेट पोलीस कोठडीत जाण्याचीही तयारी ठेवा, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.