पोलीस चौक्यांमध्ये पुन्हा सुरू झाला राबता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:28 AM2019-02-19T05:28:51+5:302019-02-19T05:29:22+5:30
गुन्ह्यांना बसेल आळा, नागरिकांना विश्वास : दुर्दशा झालेल्या चौक्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहरातील ३३ पोलीस चौक्यांच्या दुरवस्थेचे वास्तव ‘लोकमत’ने मांडल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सध्या या चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसण्यास मदतच होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘लोकमत’ने ११ फेब्रुवारीला ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून ‘अपुºया बळामुळे पोलीस चौक्याच पडल्या ओस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात कर्मचाºयांच्या तुटवड्याबरोबरच पोलीस चौक्यांची दुर्दशा, सुविधांचा अभाव यावरही प्रकाश टाकला होता.
कल्याणमध्ये १९ पोलीस चौक्या आणि १५ बीटमार्शल आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसस्टॅण्ड, सहजानंद चौक, पौर्णिमा, चिकणघर, वालधुनी या चौक्या असून त्यासाठी पाच बीटमार्शल आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहने, वायलेनगर, आधारवाडी, बिर्ला महाविद्यालय या चार चौक्या असून त्यासाठी चार बीटमार्शल आहेत.
बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत वल्लीपीर, एपीएमसी मार्केट, टिळक चौक, लालचौकी या चार चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत पत्रीपूल, नेतिवली, विजयनगर, लोकग्राम, खडेगोळवली, आनंदवाडी या सहा चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. दरम्यान, दुर्दशा झालेल्या चौक्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणीही होत आहे.
डोंबिवलीत १४ चौक्या, १३ मार्शल
डोंबिवलीत १४ चौक्या असून, १३ बीटमार्शल आहेत. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयरे, पाथर्ली चौकी, ठाकुर्ली चौकी अशा तीन चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत कोपर, डोंबिवली रेल्वेस्थानक, सम्राट चौक, उमेशनगर या ठिकाणी चार चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याची हद्द सर्वात मोठी आहे. या हद्दीत काटई चौकी, पी अॅण्ड टी चौकी, पेंढरकर चौकी आणि रिजन्सी चौकी अशा चार चौक्या आणि चार बीटमार्शल आहेत. तर, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी उद्योगनगर, कचोरे व गोपाळनगर या तीन पोलीस चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन गाड्याही आहेत.