लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर मध्ये २ ऐवजी ३ ते ४ प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे . या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे , रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली .
शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . किमान शेअर भाडे १० रुपये होते . पण २ प्रवासी घ्यायचे म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केलेलं आहे . त्या प्रमाणेच अंतर नुसार शेअर भाडे वाढवले आहे . उत्तन साठी तर ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत .
एकीकडे २ प्रवासी घ्यायचे म्हणून भाडे वाढवणाऱ्या अनेक रिक्षा चालकांनी मात्र चक्क ३ ते ४ प्रवासी भारत भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी होऊ लागल्या . रात्रीच्या वेळी तर सर्रास ३ - ४ प्रवासी भरले जातात . ह्या वरून प्रवाश्यां सोबत रिक्षा चालकांचे वाद होऊ लागले . मीटर प्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते .
ह्या बाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी , रिक्षा चालक , नगरसेवक सुरेश खंडेलवाल , ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली .
ह्या वेळी काही रिक्षा चालकांनी ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर राग व्यक्त करत तुम्ही जुने असून सर्वाना ओळखता तरी देखील आमच्या कडे अडचण न सांगता थेट सरसकट सर्व रिक्षा चालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही असे खडे बोल सुनावले .
काही रिक्षा चालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा आम्ही मध्ये येणार नाही असे रिक्षा संघटनांनी स्पष्ट केले . रेल्वे स्थानक जवळील सुशोभीकरणाच्या कामा मुळे होत असलेली वाहतूक कोंडी , अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे , बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्दे सुद्धा चर्चेत आले .
ह्यावेळी भामे यांनी स्पष्ट केले कि , २ पेक्षा जास्त प्रवासी बसवल्यास रिक्षांवर कारवाई केली जाईल . प्रत्येक रिक्षा वर त्या रिक्षा आणि चालकाच्या माहितीचा तसेच प्रवाश्याना तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्यात येणार आहे . रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरणाच्या कामा मुळे रस्ता अरुंद झाला असून पालिकेला कळवले आहे . रिक्षा स्थानक बाबत पालिकेशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे भामे यांनी सांगितले .
दरम्यान शेअर मार्गा बरोबरच कायद्याने बंधनकारक असलेल्या मीटर पद्धतीने भाडे आकारणी सुरु करण्या बाबत आरटीओ व पोलिसां सोबत बैठक होणार आहे . शहरात मीटर पद्धती सुरु झाल्यास प्रवाश्यांना आणि रिक्षा चालकांना सुद्धा लाभ होईल. त्यामुळे मीटर प्रमाणे भाडे घेण्याची मागणी केल्याचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले .