उल्हासनगर : शहर भु-मापन कार्यालया अंतर्गत कोणत्याही जागेची मोजणी करतांना शेजारील जागा मालकांना नोटिसा देत नसल्याने, कार्यालयाच्या चौकशीची मागणी मनसेचे बंडू देशमुख यांनी जिल्हा भु-मापन अधिकाऱ्यांना केली. महापालिका शाळा मैदाना बाबत असाच प्रकार घडल्याने, शाळा मैदानावर सनद दिल्याची शक्यता देशमुख यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर भु-मापन कार्यालया अंतर्गत कोणत्याही जागेची मोजणी करण्यापूर्वी शासनाच्या नियमानुसार जागेच्या पुर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण बाजूला असणाऱ्या सर्व मालमत्तांधारकांना नोटीस देऊन करावी लागते. मात्र या नियमाला पायदळी तुडवून भूमापन अधिकाऱ्यांनी साईट नंबर १०९, शिट नंबर ७४,७५ या जागेची व अशा अनेक जागांची मोजणी करतांना आजूबाजूच्या मालमत्ता धारकांना नोटीस न देताच अतितातडीने जागेची मोजणी करून, उपविभागीय अधिकारी यांना अहवाल सादर केला. असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी करून यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
विशेष बाब म्हणजे, ज्या मालमत्तेची मोजणी करण्यात आली. ती मालमत्ता उल्हासनगर महापालिका शाळा क्र- १९ व २२ या शाळा मैदानाची आहे. सदर मैदान १९८७ साली ताबापावतीवर महापालिकेच्या ताब्यात आहे. याबाबतची माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक महापालिका प्रशासनाला याची पुर्व सूचना न देताच अतितातडीने या मैदानाची मोजणी भु-मापन कार्यालयाकडून केली. त्यानंतर सदर मैदानाची सनद एका खाजगी संस्थेला देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी याला आक्षेप घेतल्याने, याप्रकारचा भांडाफोड झाला. मैदानाची किंमत कोट्यवधींच्या घरात असून मालमत्ता मिळकत पत्रिकेवर उल्हासनगर महापालिकेच्या नावाची नोंद आहे. मालमत्तेची मोजणी करतांना भु-मापन अधिकाऱ्यांनी पुर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिणचे मालमत्ताधारक उपस्थित नसल्याचे दाखवून तसेच महापालिकेला अंधारात ठेवून खोटा अहवाल देण्यात आल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.
शाळा मैदानाच्या चौकशीची मागणी
महापालिका शाळेच्या मैदानावर सनद दिलीच कशी? यासर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी जिल्हा भू-मापन अधिकारी बाबासाहेब रेडेकर यांच्याकडे केली. तसेच याप्रकारणाशी संबधित अधिकारी व कर्मचारी या कालावधीत कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा सिडीआर तपासण्याची मागणी केली.