लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनटक्के गावातील पोलीस पाटील दीपक पाटील यांच्यावर गावातील गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली होती. या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. याप्रकरणी गणेश मारुती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एक महिन्यांपासून आरोपी फरार असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात तालुका पोलिसांना यश आलेले नाही. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपींकडून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. परंतु महिना उलटूनही आरोपी मोकाट असल्याने पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.
या पोलीस पाटील हल्ल्याचा श्रमजीवी संघटनेबरोबरच पोलीस पाटील संघटनेने जाहीर निषेध केला आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने लवकर अटक करावी, अन्यथा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, भिवंडी शहर व तालुकाध्यक्ष सागर देसक, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी पोलीस पाटील संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष साईनाथ पाटील, भिवंडी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील आदींनी दिला आहे.