मान्सूनपूर्व पावसाने वृक्ष प्राधिकरणाची दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:02+5:302021-05-19T04:41:02+5:30
ठाणे : मान्सूनपूर्व झालेल्या एक दिवसाच्या वादळ-वाऱ्यासह झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचा कारभार अवघ्या २४ तासांत ...
ठाणे : मान्सूनपूर्व झालेल्या एक दिवसाच्या वादळ-वाऱ्यासह झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचा कारभार अवघ्या २४ तासांत चव्हाट्यावर आणला आहे. एका दिवसांत शहराच्या विविध भागात तब्बल १५९ वृक्ष उन्मळून पडले आहेत. यामध्ये अनेक नव्या, जुन्या वृक्षांचा समावेश आहे. यामुळे २० ते २५ वाहनांसह अनेक घरांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. याला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभागाच जबाबदार असल्याचा आरोप होत असून, मान्सूनपूर्व वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे अपेक्षित असतानाही ती कामेच न झाल्याने ठाणेकरांवर ही वेळ आली आहे.
ठाण्यात प्रत्यक्ष स्वरूपात पावसाला आणखी काही दिवस शिल्लक आहेत; परंतु त्या आधीच मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या कामाची पोलखोल केली आहे. शहरातील नाल्यांवरील गाळ रस्त्यांवर आल्याचे दिसत होते. अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर शहराच्या विविध भागात तब्बल १५९ वृक्ष उन्मळून पडले तर २१ ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्या असून, १७ ठिकाणचे वृक्ष हे धोकादायक स्थितीत आले आहेत. विशेष म्हणजे मान्सूनला अद्याप सुरुवात होणे बाकी असून, ती झाली तर शहरातील वृक्षांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
वास्तविक पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील वृक्षांच्या फांद्या छाटण्याची कामे करणे अपेक्षित असते; परंतु वृक्ष प्राधिकरणाने यंदा वेळकाढूपणा केल्याने तेच याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा ठपका सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला.
शहरातील वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम हे जानेवारीपासूनच सुरू करावे, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी वृक्ष प्राधिकरण सभेमध्ये वारंवार केली होती, तसेच यासाठी वेळ वाया न घालविता वार्षिक टेंडर काढण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबतही अति. आयुक्त यांना निर्देशित केले होते; परंतु ठाणे शहरात अद्यापही ट्रिमिंग केले नाही. गेल्या वर्षीच्या ट्रिमिंगच्या कामांची बिले ही ठेकेदारांना आजतागायत अदा केली नसल्याने ते काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत; मात्र याचा फटका ठाणेकरांना बसत असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले यांनी दिली.