लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनपा प्रशासनाने खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल येथे कोविड सेंटर सुरू केले. सध्या शहरात रुग्णसंख्या कमी असून, या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्ण नाहीत; मात्र खबरदारी म्हणून सेंटर, वैद्यकीय मनुष्यबळ कायम ठेवण्यात येणार आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत शहरात फक्त २८ रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर शनिवारी अवघ्या तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. भिवंडीचा विचार केल्यास शहरात आतापर्यंत १० हजार ६०२ रुग्णांची नोंद झाली असून, १० हजार ११२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर ४६२ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील रुग्णासंख्या कमी झाल्याने मृत्युदरही कमी झाला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १८३५ दिवसांवर गेला आहे.
मनपा प्रशासनाच्या वतीने धोबीतलाव परिसरातील खुदाबक्ष हॉल येथे १३० बेडचे, तर कामतघर येथील वऱ्हाळादेवी मंगल कार्यालय कोविड सेंटर येथे १३० बेडचे असे २६० बेडचे कोविड सेंटर उभारले आहेत, तर शहरात २३ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली असून, या २३ खासगी रुग्णालयांमध्ये साधारणत: ६१२ बेड उपलब्ध आहेत.