मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये सोमवार रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने मीरा-भाईंदर पाण्याखाली गेले. सर्वत्र पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन ठप्प झाले. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर मार्गदेखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली. मुसळधार पावसामुळे काशिमीरा लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहून येत होते. पाण्यासह मातीदेखील मोठ्या प्रमाणात वाहत आली. महाजनवाडीमध्ये तर पाण्यासह अजगर देखील वाहून आला होता. पाण्यातून जीव वाचवत तो एक दुकानाच्या भिंतीवर चढला. त्याला गोणीत अन्यत्र सोडण्यात आले. वन हद्दीलगत नैसर्गिक ओढ्यावर सरकारी जागेत या भागातील चाळी असून रहिवाश्याना २००५ च्या महाप्रलयचा अनुभव असल्याने रात्री कोणी झोपले नाही.
काशिमीरा भागातून जाणार मुंबई अहमदाबाद महामार्ग व परिसर तर चेणे गावातून जाणारा घोडबंदर मार्ग व वरसावे नाका देखील पाण्याखाली गेला होता. लहान वाहने तर पाण्यात बंद पडल्याने लोकं अडकून पडली. काशिमीराचा ग्रीन व्हिलेज संकुल, मीरारोडचे सिल्वर सरिता, विनय नगर, कृषणस्थळ, अमिष पार्क, मुन्शी कंपाउंड, आरएनए ब्रॉडवे, विजय पार्क, प्लेझन्ट पार्क, शांती नगर, शीतल नगर, शांतिपार्क, कनकिया, नया नगर, हाटकेश, काशिगाव, सिल्वर पार्क आदी जवळपास सर्व मीरारोडच पाण्यात गेले.
तर भाईंदरच्या गोडदेव, महात्मा फुले मार्ग, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, नाकोडा रुग्णालय गल्ली, राई - मोरवा मार्ग, पाली, उत्तन, बाळाराम पाटील मार्ग, नर्मदा नगर जलमय झाले होते. शहरातील बहूतांश परिसरात कमरे एवढे पाणी साचले होते. लोकांच्या घरात व दुकानात सांडपाणी आणि पुराचे पाणी शिरल्याने घरातील फर्निचर, वस्तू आदींचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरात चूल देखील पेटली नाही. लोकांच्या गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्याचेसुद्धा नुकसान झाले आहे. गाड्या पाण्याखाली जातील या भीतीने लोकांनी सोमवारी रात्रीच गाड्या रस्त्यांच्या मध्येच उभ्या केल्या होत्या.
पालिकेने पाणी उपसासाठी ठेक्याने ठेवलेले पंप निरुपयोगी ठरले. दुपारी पावसाने जराशी विश्रांती घेतली तसेच भरती ओसरू लागली म्हणून शहरातील पाणी ओसरू लागले होते. पण सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला. पालिकेची नाले व अंतर्गत गटार सफाई कुचकामी ठरलीच शिवाय खाड्या, नाले, ओढे यातील बेकायदेशीर भराव - बांधकामे, कांदळवन, सीआरझेड मधील भराव - बांधकामांमुळे पाण्याचा निचरा झाला नाही. पाणी साठवून ठेवणारे होल्डिंग पॉईंट या भराव - बांधकामामुळे नष्ट केल्याचासुद्धा मोठा फटका बसला, असे जाणकारांनी सांगितले.