लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कदम यांची २०२० ते २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे. घंटाळी येथील आयएमएच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रीया गुरुवारी पार पडली. डॉ. जगदीश रामचंदानी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.आयएमएच्या ठाणे शाखेच्या १५ सदस्यीय समितीमध्ये डॉ. वेधक निमकर आणि डॉ. महेश जोशी यांची अनुक्रमे सचिव आणि खजिनदारपदी निवड झाली आहे. डॉ. कदम यांनी त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांसह या डॉक्टर संघटनेचा कार्यभार स्वीकारला. डॉ. कदम हे गेली दोन वर्षे सचिव म्हणून या संघटनेमध्ये कार्यरत होते. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे कार्यकारी सदस्य म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम पाहिले आहे.कोरोना साथीच्या आजारात त्यांनी झोकून देऊन योगदान दिले. गेली चार महिने अथक प्रयत्न करुन त्यांनी ठाण्यातील अनेक कोरोना बाधितांना सेवा दिली. यातच त्यांना कोरोनाची लागणही झाली. कोरोनावरही त्यांनी यशस्वीपणे मात करुन ते पुन्हा कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सामील झाले.ठाणे आयएमएने शहरी दवाखान्यांमध्ये मदत करण्यासाठी डॉक्टरांची टीम उपलब्ध करून दिली आहे. तसेच १५ खासगी रु ग्णालये रुपांतरीत करण्यासाठी आणि समर्पित कोविड रु ग्णालये म्हणून ही त्यांनी सेवा प्रदान केल्या. आपल्या संघटनेमार्फत त्यांनी सर्व शासकीय तसेच ठाणे महानगरपालिकेला मदतीचा हात दिला आहे.